टीसीएसने तीन महिन्यांत दिला २२० कोटींचा निवडणूक निधी
टीसीएसकडून देण्यात आलेली ही रक्कम आतापर्यंतची कॉर्पोरेट कंपनीकडून देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम
नवी दिल्ली : टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) ने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी ते मार्चपर्यंतच्या तिमाहीत निवडणूक संस्थेला २२० कोटी रुपयांचा निवडणूक निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी घोषित केलेल्या वित्तीय आकडेवारीमध्ये कंपनीने हा खर्च इतर नफा-तोटा खर्चाच्या अंतर्गत ठेवला असल्याचे सांगितले आहे. टीसीएसकडून देण्यात आलेली ही रक्कम आतापर्यंतची कॉर्पोरेट कंपनीकडून देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम असल्याचे बोलले जात आहे. टीसीएसने कोणत्या निवडणूक संस्थेला ही रक्कम दिली आहे आणि संस्थेकडून ही रक्कम कोणत्या राजकीय पक्षाला देण्यात आली आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
टीसीएससह टाटा समूहाच्या कंपन्यांनी याआधीही निवडणूक संस्थेला पैसे देऊन राजकिय पक्षांची मदत केली आहे. टीसीएसने टाटा ट्रस्टमार्फत २०१३ साली स्थापन करण्यात आलेल्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टला (पीईटी) पैसे देण्यात आले होते. टीसीएसकडून पीईटीला १.५ कोटी रूपयांचे योगदान देण्यात आले होते. पीईटीने १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ मध्ये राजकीय पक्षांना पैसे देऊन त्यांची मदत केली होती. पीईटीकडून याद्वारे बीजू जनता दल पक्षाला सर्वाधिक मदत करण्यात आली आहे. पीईटीने नुकतंच निवडणूक आयोगाकडे आपला वार्षिक अहवाल सादर केला होता. पीईटीने २०१७-१८ या वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाला निधी देणार नसल्याचे निडणूक संस्थेकडून सांगण्यात आले होते. पीईटीने अहवालात ५४,८४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते.
भारतात अनेक निवडणूक संस्था आहेत, जे कॉर्पोरेट आणि राजकीय पक्षांमधील मध्यस्थ आहेत. प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट ही सर्वात मोठी निवडणूक संस्था आहे. ज्यात भारती ग्रुप आणि डीलएफ यांचे सर्वात मोठे योगदानकर्ते आहेत. २०१७-१८ साली एकूण १६९ कोटी जमा रक्कमेच्या १४४ कोटी रूपये भाजपाला देण्यात आले होते.