अरुण हर्ष, झी मीडिया, जोधपूर : नोकरीला जाणाऱ्या बऱ्याच महिलांसाठी प्रेशर कुकर हा जणू एक वरदान. अवघ्या काही मिनिटांमध्ये चवीष्ट जेवण बनवण्यासाठी हा गृहिणींचा मित्र त्यांना अशी काही मदत करतो, की तुम्हीही अवाक् व्हाल. पण, हाच कुकर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अन्यथा मोठा धोका समोर उभा ठाकलाच म्हणून समजा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच धोक्यापासून अनेकांना वाचवण्याचं काम नुकतंच भारतीय मानक ब्युरोच्या टीमनं केलं आहे. जोधपूरमध्ये ही कारवाई करत भारतीय मानक ब्युरोच्या पथकानं मोठ्या प्रमाणात ISI मार्क नसलेले प्रेशर कुकर जप्त केले आहेत. 


इथं मोठ्या प्रमाणात प्रेशर कुकर तयार केले जात असल्याची माहिती टीमला मिळाली होती, जे आयएसआय मार्क नसतानाही बाजारात खरेदीसाठी उबलब्ध करुन दिले जात होते. सदर प्रकरणाची माहिकी मिळताच भारतीय मानक ब्युरोच्या पथकाने जोधपूरच्या संगरिया औद्योगिक परिसरात कारवाई केली. 


कारवाई अंतर्गत महालक्ष्मी मेटल्स नावाच्या कारखान्यावर छापा मारत इथून प्रेशर कुकर जप्त करण्यात आले. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात तीन आणि पाच लिटरचे प्रेशर कुकर बनवलेले ताब्यात घेण्यात आले, ज्यावर कोणत्याही प्रकारचं मानक संबंधित चिन्ह दिसलं नाही. 



ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कायद्याच्या कलम 16 (1) च्या तरतुदींनुसार, ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारत सरकारने घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश 2020 जारी केला. आयएसआय मार्कशिवाय प्रेशर कुकर विकणाऱ्या उत्पादकांवर किंवा दुकानदारांवर भारतीय मानक ब्युरो कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.