SIM Card विकत घ्यायचंय, 1 डिसेंबरपासून `हे` कडक नियम लागू होणार
New SIM Card Rules: भारतात मोबाईलच सिम कार्ड घेण्याचे नियम आणखी कडक केले जाणार आहेत. 1 डिसेंबरपासून सिमकार्डशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. या नियमांनुसार, सिम खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पडताळणी केली जाणार आहे. ग्राहकांसोबतच विक्रेत्यांचीही व्हेरिफिकेशन होणार आहे.
New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे.
अधिक तपशील द्यावा लागणार
नवीन सिमकार्ड खरेदी करताना ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक तपशील द्यावा लागणार आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीने गु्न्हा केला तर त्या सिमकार्डशी लिंक केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यक्तिचा सहजपणे मागोवा घेतला जाऊ शकतो. सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सायबर गुन्हेगारीत सर्वाधिक गुन्हे हे बोगस नावाने घेतल्या सिमकार्डवर केले जातात. पण नवीन नियम लागू झाल्यानंतर इतर कोणाच्या नावावर सिम कार्ड घेणं शक्य होणार नाही.
सिम कार्ड बदलल्यास काय होईल?
नविन सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला आधार कार्ड आणि डेमोग्राफिक डेटा द्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर ज्या व्यक्तीकडून किंवा दुकानातून तुम्ही सिम कार्ड विकत घेतायत त्यालाही व्हेरिफिकेशन (Verification) प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. सरकारने सिम कार्ड डिलरचंही व्हेरिफिकेशन करावं लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
10 लाख रुपयांपर्यंतचा दंड
नियमांचं पालन न केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणार आहे. एकाचवेळी अनेक सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. एकाचवेळी जास्त सिमकार्ड घेण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत व्यावसायिक कागदपत्र असणं गरजेचं आहे. 90 दिवसांनंतर ही सिमकार्ड इतरांच्या नावावर होऊ शकतात.
एक व्यक्ती आपल्या ओळखपत्रावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड विकत घेऊ शकतो. एखादं सिम कार्ड डिएक्टिव्ह केल्याच्या 90 दिवसांनंतर ते दुसऱ्या व्यक्तीला जारी केलं जाऊ शकतं. 30 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही सिम विक्रेत्याने नोंदणी केली नाही तर त्याला दंड आणि तुरुंगात पाठवलं जाऊ शकतं.