Telangana News: आगामी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या पोलिसांना गडवाल येथील राष्ट्रीय राजमार्ग (एनएच) वर मंगळवारी एक संशयास्पद ट्रक थांबवत ताब्यात घेतला होता. मंगळवारी 10.30 च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली होती. ट्रकची पाहणी करत असताना पोलिसांना यात कोट्यवधीची रक्कम सापडली. निवडणुकीच्या आधीच इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळं पोलिसांना यात काही काळंबेर असल्याचा संशय आला. त्यानंतर हे प्रकरणी अधिक चौकशी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या महामार्गावरुन हा ट्रक जात होता तो गडवालयेथील महामार्ग तस्करीसाठी ओळखला जातो. त्यामुळं पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता. हा ट्रक केरळहून हैदराबाद येथे जात असून तो युनियन बँक ऑफ इंडियाचा ट्रक होता. टाइम्स ऑफ इंडियानेदेखील यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तेलंगणातील मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी लगेचच युनियन बँक ऑफ इंडियातील अधिकाऱ्यांशी संपर्क करत याची खातरजमा केली. त्यानंतर खरंच हा ट्रक बँकेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निर्माण झालेला गोंधळ थांबला. विकास राज यांनी म्हटलं की, 750 कोटी रुपयांची रक्कम असलेला ट्रक सापडल्यानंतर काही तास मोठी खळबळ उडाली होती. मात्र, सगळी चौकशी व खातरजमा केल्यानंतर या ट्रक बँकेचा असून चेस्ट टू चेस्ट मनी ट्रान्सफर करण्यात येत होतं. पडताळणी झाल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला सोडून दिले. 


अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारी यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना गोवा आणि इतर ठिकाणांहून महाबुगनगरमार्गे हैदराबाद येथे होणारी तस्करी रोखण्यास सांगितले होते.