नवी दिल्ली : डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे जवानांना आता आपले कुटुंबिय आणि निकटवर्तींयांसोबत सॅटलाईट फोनवरुन जास्तीत जास्त वेळ बोलता येणार आहे. ही मंत्रालयाने जवानांना दिलेली दिवाळी भेट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे जवान कॉल चार्जेंसचा फार विचार न करता आपल्या प्रियजनांसोबत जास्त वेळ बोलू शकतात असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. याआधी जवान सॅटलाइट फोन कॉल्ससाठी महिन्याला ५०० रुपये मोजायचे. या फोनवरुन बोलताना एक मिनिटाचा दर पाच रुपये होता. आता हाच कॉल दर सरकारने प्रतिमिनिट एक रुपया केला आहे.


या निर्णयामुळे वर्षाला सरकारच्या तिजोरीवर तीन ते चार कोटी रुपयांचा भार पडेल असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. 
यापूर्वी टाटा कम्युनिकेशन सॅटलाइट फोनची सेवा देत असे. आता सरकारी कंपनी बीएसएनएल सॅटलाइट फोनची सुविधा देणार आहे.


सध्याच्या घडीला देशभरात २५०० सॅटलाइट फोन कनेक्शन्स आहेत. आमची ५ हजार कनेक्शन्स देण्याची क्षमता आहे. पुढच्या सहा महिन्यात गरज पडली तर कनेक्शन्सची संख्या वाढवण्यात येईल असे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.