काश्मीरमध्ये जे होतंय त्याची भाजप-पीडीपीने जबाबदारी घ्यावी - असदुद्दीन ओवेसी
जम्मू काश्मीरच्या सुंजवां सैनिक दलाच्या चौकीनंतर सीआरपीएफच्या चौकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीने भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या सुंजवां सैनिक दलाच्या चौकीनंतर सीआरपीएफच्या चौकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीने भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले ओवेसी?
न्यूज एजन्सी ANI सोबत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘भाजप-पीडीपी दोघेही बसून मलाई खात आहेत. कधीपर्यंत ड्रामा करणार आहेत. हे त्यांचं अपशय आहे. आता याचा विचार करावा लागणार आहे की, या गोष्टींची जबाबदारी कुणाची असेल. ७ पैकी ५ जे मारले गेले आहेत ते काश्मीरी मुस्लिम होते. आता यावर काहीच कसं बोललं जात नाहीये. ज्यांना मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका आहे त्यांनी यातून बोध घ्यावा. ते आजही मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणत आहे. आणि ते जीव देत आहेत’.
श्रीनगरमध्ये चकमकीत दशतवाद्यांचा खात्मा
सुरक्षा रक्षकांनी श्रीनगरमधील करन नगरच्या एका इमारतीत गेल्या २४ तासांपासून लपलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. यात एक अज्ञात दहशतवादी मारला गेला. एका पोलीस अधिका-याने सांगितले की, ‘सुरक्षा दलाच्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेलाय. तो कोणत्या संघटनेचा होता याची माहिती अजून मिळू शकली नाही’.
सुंजवां हल्ला : आणखी एका जवानाचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या १०
जम्मू-काश्मीर येथील सुंजवां येथून आज एका जवानाचा मृतदेह मिळाला आणि त्यासोबतच मृतकांची संख्या १० वर पोहचली आहे. या चकमकीत सेनेचे सहा जवान शहीद झाले आहेत. तर जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात आधी जम्मू काश्मीरचे ५ जवान शहीद झाले होते. एका शहीद जवानाच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. तर या हल्ल्यात दोन अधिका-यांसहीत सहा महिला आणि लहान मुलांसह १० लोक जखमी झाले होते.