नवी दिल्ली : काश्मीरसाठी जिहाद आणि संघर्ष सुरुच ठेवणार असल्याची मुक्ताफळं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाहुद्दीननं उधळली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सलाहुद्दीननं रॅली काढली होती. या रॅलीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं आपली वायफळ बडबड सुरुच ठेवली आहे.


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतरही सलाहुद्दीनची मुजोरी कायम असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेच्या या घोषणेचा निषेध करत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय म्हणजे मूखर्पणा असल्याचं त्यानं म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळेही सलाहुद्दीनचा जळफळाट झाला आहे. या भेटीवरही त्यांनं यावेळी टीका केली आहे.