भाजप सरकारचे वाईट दिवस आले, `सर्जिकल स्ट्राईक`चा पुन्हा आधार - चिदंबरम्
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारला उपदेशाचे डोस पाजले असताना आता भाजप सरकारवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल चढवलाय.
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारला उपदेशाचे डोस पाजले असताना आता भाजप सरकारवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल चढवलाय. भाजप सरकारचे वाईट दिवस आल्याने त्यांनी पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक'चा आधार घेतल्याची टीका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांनी केलेय.
भारत-म्यानमार सीमेवर नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्कराने कारवाई करून उद्ध्वस्त केले. सीमा पार न करता ही कारवाई केली गेली. त्यात अनेक दहशतवादी मारल्याचा दावा भाजप सरकारने केलाय. या पूर्वीही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्यात, असे सांगून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडलेय. भाजप सरकार त्यांचे वाईट दिवस आल्याने 'सर्जिकल स्ट्राईक'चे अस्त्र बाहेर काढते, असा हल्ला चिदंबरम् यांनी केलाय.
सीमेवर दहशतवाद्यांमध्ये नेहमीच चकमकी होत असतात. अशाच घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. ज्यावेळी मी गृहमंत्री होतो त्यावेळीही लष्कराने, अशा अनेक कारवाया केल्या. एव्हढेच काय माझ्याआधीही लष्कराने कारवाया केल्या आम्ही याचे भांडवल केलेले नाही, वाईट दिवस आल्याने असा आधार घ्यावा लागतो, असे चिदंबरम् म्हणालेत.