आज आकाशात पाहता येणार उल्कावर्षाव
आज रात्री लूटता येणार उल्कावर्षावाचा मनमुराद आनंद
मुंबई : आकाशातून पडणारे तारे पाहायचे असतील तर आज रात्री नक्की जागे राहा. आज रात्री म्हणजेच मध्यरात्रीनंतर ३ वाजता उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहे. ययाती तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्याने अधिक प्रेक्षणीय दिसणार आहे. ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर क्षितिजावर ययाती तारकासंघातून हा उल्कावर्षाव दिसेल.
आकाश निरभ्र असल्यास तासाला साठ ते सत्तर उल्का पडताना दिसू शकतील असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. वर्षभरात 10 ते 12 उल्कावर्षाव होत असतात. पृथ्वी धूमकेतूच्या कक्षेत आली की हा उल्कावर्षाव होतो. लघुग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच पेट घेतात त्यामुळे ते उल्का तेजस्वी दिसू लागतात.
उल्कावर्षावाचा जर तुम्हाला मनमुराद आनंद लुटायचा असेल तर शहरापासून दूर अंधाराच्या ठिकाणी जा. या ठिकाणी तुम्हाला उल्कावर्षाव पाहायला मिळेल. एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावरुन तो अजून स्पष्ट दिसेल.