नवी दिल्ली : काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जम्मूमधून दुपारी साडे तीन वाजता जवानांचा ताफा श्रीनगरला जाण्यासाठी निघाला. गेले काही दिवस बर्फवृष्टीमुळे जवान जम्मूमध्ये  अडकून पडले होते.वातावरण चांगले असल्याने जवान जम्मूहून निघाले होते. एका ताफ्यामध्ये नेहमी १ हजार जवान असतात. पण बर्फवृष्टीमध्ये अडकल्याने अडीच हजार जवान  श्रीनगरला जात होते. सीआरपीएफच्या ७८ गाड्यांमध्ये अडीच हजार जवान होते. यामधले अनेक जवान सुट्टी संपवून रुजू होत होते. श्रीनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर अवंतिपुरामध्ये जवानांच्या गाड्या पोहोचताच हल्ला  झाला. 



काकापोरामधला दहशतवादी अदिल अहमद  स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन आला. अदिल २०१८ मध्ये जैश-ए-मोहम्मदला सामील झाला. अदिलने १०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी बसवर धडकवली. बसमध्ये सीआरपीएफच्या ७६ बटालियनचे जवान होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. पाकिस्तानमधल्ये आयएसआयने या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण दिले.



इतिहासातल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. बदला घ्यावाच लागेल. आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावीच लागेल, अशी मागणी देशातून होत आहे.