लोकसभा निवडणूक २०१९: मोदींकडून आकडा न सांगता विक्रमी विजयाचा दावा
दिलेली अश्वासने पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे केवळ काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळे उर्वरीत वेळेत मोदी सरकार किती आणि कशी आश्वासने पूर्ण करते याबाबत जनतेत उत्सुकता आहे.
नवी दिल्ली: आपल्या प्रभावी भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या विजयाबाबत भविष्यवाणी केली आहे. नेहमीच्या आत्मविश्वासपूर्ण शैलीत आपले मत ठासून सांगताना 'आपण २०१४च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकू', असे मोदींनी म्हटले आहे. देशातील जनतेला चांगली कामगिरी करणारे निर्णयक्षम आणि भक्कम सरकार हवे असल्याचेही मोदी म्हणाले.
भाजप सरकारच्या आश्वासन पूर्ततेबाबत जनतेत उत्सुकता
नरेंद्र मोदी यांनी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला ई-मेलद्वारे मुलाखत दिली. या मुलाखती मोदींनी २०१९मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि देशासमोरील विविध प्रश्न याबाबत मते व्यक्त केली. निवडणूक जिंकण्याबाबत दावा करतानाच देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोदींना चिंता वाटते. मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे तसेच, प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. असममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याबाबतही मोदींनी सांगितले. दरम्यान, दिलेली अश्वासने पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे केवळ काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळे उर्वरीत वेळेत मोदी सरकार किती आणि कशी आश्वासने पूर्ण करते याबाबत जनतेत उत्सुकता आहे.
महाआघाडीची खिल्ली उडवत जोरदार टीकास्त्र
दरम्यान, मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची खिल्ली उडवत जोरदार टीकास्त्र सोडले. परस्पर विरोधी मात्र, असमान आणि हताश झालेल्या पक्षांचा समूह म्हणजे महाआघाडी, अशी व्याख्याच मोदींनी केली. येत्या निवडणुकीत 'विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास' हा आपला कार्यक्रम असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच, २०१९मध्ये २०१४चा विक्रम मोडीत काढू असेही मोदींनी म्हटले.