एक निर्णय असाही! चोराला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधिशांनी केली अशी मदत...
न्यायाधिशांनी नक्की काय केलं...एकदा पाहाच
नालंदा : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशात अनेक गरिबांसाठी दोन वेळेचं जेवण कठीण होत आहे. या संकटकाळी काही लोक गरिब-गरजूंसाठी पुढे आले असून त्यांना जेवणापासून इतर सुविधांचीही सोय करुन देत आहेत. असाच एक प्रकार बिहारमधील नालंदामधून समोर आला आहे. चोरीच्या आरोपाखाली न्यायालयात आणण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाला न्यायाधिशांनी शिक्षा देण्याऐवजी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला रेशन देऊन त्याची मदत केली आहे.
हे प्रकरण इस्लामपूरमधील खटोलना गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने कोरोना संकटाला कंटाळून जेवणासाठी चोरी केल्याचं समोर आलं. कोणीतरी त्या मुलाला चोरी करताना पाहिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं आणि शुक्रवारी बिहार शरीफ जुवेनाईल कोर्टात हजर केलं.
कोर्टात न्यायाधीश मानवेंद्र मिश्र यांनी, संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर त्या मुलाची बाजू समजून, त्याची मजबूरी समजून त्याला आरोपातून मुक्त केलं आणि न्यायाधिशांनी अधिकाऱ्यांना त्या मुलाला शक्य तितकी मदत करण्याचं आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले.
त्याशिवाय कोर्टाने त्या अल्पवयीनसंबंधी प्रगती अहवाल 4 महिन्यांमध्ये सादर करण्याचे आदेशही पोलिसांना दिले.
न्यायाधिशांनी दिलेल्या आदेशानंतर इस्लामपूरचे अधिकारी त्या अल्पवयीन मुलाच्या गावी पोहचले आणि त्याला खाण्या-पिण्याचं सामान दिलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबाला सर्व सरकारी योजना मिळण्यासाठी कागदपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली. या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर मुलाची आई त्या तिच्या मुलावरच अवलंबून आहे.
न्यायालयाच्या या आदेशानंतर त्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाने मुलाला माफ करुन सुधारण्याची नवी संधी दिली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या भागातील प्रमुख लोक, इतर नागरिकही या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.