भारतीय सीमेत घुसखोरी करणारी पाक तरुणी गोळीबारात जखमी
भारतीय सीमेत घुसखोरी करणारी तरुणी गोळीबारात जखमी
चंदीगड : पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यातील सेक्टर डेरा बाबा नानकमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) च्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी युवतीवर गोळी झाडली आहे. जखमी तरुणीला 275 कि.मी दूर असलेल्या डेरा बाबा नानकमधील राजकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या बांगर चौकीजवळून महिला भारतात येण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे निदर्शनास येताच जवानांनी तिला हटकले. तिला तिथेच थांबण्यास तसेच मागे जाण्यासाठी विनंती केली गेली. पण त्या महिलेने जवानांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि भारतात घुसखोरी करु लागली. त्यानंतर पर्याय नसल्याने जवानांना तिच्यावर गोळी चालवावी लागली. जखमी महिला भारतीय हद्दीत आली. त्यानंतर बीएसएफ जवानांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
पुलवामा येथे लष्करी जवानांवर झालेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत. पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना पाठीशी घालत आले आहे. यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष राष्ट्राचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. निर्यात वस्तूंवरील कर देखील वाढवण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीमधून काढून टाकण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पाक संघ वर्ल्डकपमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. सीमेवर तणावाचे वातावरण आहे. भारताने याआधीच पाकिस्तानला तंबी दिली आहे. तरीही पाकिस्तानकडून सीमा रेषा नियमांचे उल्लंघन वारंवार केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.