फॅनी चक्रीवादळाचा भारतावरचा धोका टळला; वादळ बांग्लादेशच्या दिशेने सरकले
फॅनी चक्रीवादळाचा वेग मंदावला असून पश्चिम बंगालची वेस ओलांडून बांगलादेशाच्या दिशेने सरकले आहे.
नवी दिल्ली : अतिविध्वंसक फॅनी चक्रीवादळाचे भारतावरचे संकट टळले आहे. फॅनी चक्रीवादळाचा वेग मंदावला असून पश्चिम बंगालची वेस ओलांडून बांगलादेशाच्या दिशेने सरकले आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरूच असलेले पाहायला मिळाले. कोलकाता विमानतळ शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासून बंद करण्यात आले होते. अखेर आज सकाळी साडे दहाच्या सुमारास विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले. कोलकाता शहरासह पश्चिम बंगलाच्या किनारपट्टीच्या भागात ठिकठिकाणी झाडे कोसळली, वाहतूक, वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच पाच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
फॅनी चक्रीवादळ भारतातून बांग्लादेशात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सर्व सार्वजनिक तसेच खासगी संस्थांना वादळाचा सामना करण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने फॅनी वादळाची तीव्रता लक्षात घेत जवळपास ५ लाख लोकांना सुरक्षिक ठिकाणी हलवण्यात आले आहे. सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या लोकांना खाद्यसामग्री आणि इतर सामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या तुलनेत बांगलादेशात फॅनी वादळाचा तडाखा कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.