रेल्वे टीसींच्या हाती दिसणार टॅब, आरक्षणानंतर रिकाम्या जागा कळणार
तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात. आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र, गाड्यांत काही जागा रिकाम्या असतील त्याचा लाभ तुम्हा मिळू शकतो.
मुंबई : तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात. आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र, गाड्यांत काही जागा रिकाम्या असतील त्याचा लाभ तुम्हा मिळू शकतो. आता रेल्वे तिकीट तपासणीस अर्थात टीसींना टॅब वाटप करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून तुम्ही आरक्षणाची स्थिती जाणून घेऊ शकता. यावेळी रिकाम्या जागांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
टीसींनी टॅबचे प्रशिक्षण
मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे मार्गांवर वेगवेगळ्या स्थानकांसाठी तिकिट आरक्षणाचा कोटा दिला जातो. सुट्ट्यांच्या कालावधीत लांब पल्ल्यांचा गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. अशावेळी आसनांची स्थिती समजण्याची टीसींना देण्यात येणारे नवीन टॅब उपयुक्त होणार आहे. या टॅबच्या वापरासाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यायलात प्रशिक्षण सुरु आहे. त्यामुळे भविष्यात टीसींच्या हातात टॅब दिसणार यात शंका नाही.
मोबाईल अॅप विकसित
रेल्वे गाडीच्या डब्याबाहेर प्रवाशांच्या आरक्षणाची यादी लवकरच बाद होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने तिकीट तपासनीसांसाठी विशेष मोबाइल अॅपही विकसित केलेय. तसेच टॅब टीसींच्या हाती दिसणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने तिकीट तपासणी करण्याची सुविधा टीसींना उपलब्ध होऊ शकणार आहे.
स्थानकांवर थांबलेली मेलआणि एक्स्प्रेस, त्यातील डब्यांबाहेरील आरक्षणाची यादी, तिथे प्रवाशांची गर्दी हे दृश्य कायम नजरेला पडते. पावसाळ्यात आरक्षण तक्ता कागद भिजल्यास प्रवाशांची धावपळ होते. त्यातून टीसींवर कमालीचा ताण येतो. आता हा ताण संपण्यास मदत होणार आहे.
असा करणार दंड वसूल!
टीसींना तिकीट तपासण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स देण्याचाही विचार आहे. त्यात ऑनलाइन पद्धतीने दंड आकारता येईल, अशीही रचना करण्यावर भर आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांकडून डेबिट, क्रेटिड कार्डाच्या सहाय्याने दंड आकारणी करता येणार आहे.
ऑनलाइन तिकीट घेणाऱ्यांसाठी...
ऑनलाइन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी टॅबचा वापर महत्वाचा ठरणार आहे. सद्यस्थितीत ऑनलाइन तिकीट, पास काढणाऱ्या प्र्रवाशांकडील तिकीट, पास वैधता तपासण्यासाठी टीसींकडे कोणतेही अत्याधुनिक यंत्र नव्हते. त्यामुळे तिकीट, पास तपासताना मोबाइल बंद पडल्यास कोणताही पुरावा नव्हता. आता नव्या टॅबमुळे अनेक अडचणी दूर होतील, आशा आहे.