जामिया आणि शाहीन बागेतील आंदोलनामागे राजकीय डिझाईन- मोदी
ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA)जामिया आणि शाहीन बागेसह इतरत्र सुरु असणाऱ्या आंदोलनामागे विशिष्ट असे पॉलिटिकल डिझाइन असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कडकडडुमा येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी मोदी यांनी म्हटले की, सीएएविरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे. या माध्यमातून देशाच्या सौहार्दाला बाधा आणण्याचा डाव साधला जात आहे, अशी टीका मोदींनी केली.
ही आंदोलने केवळ एका कायद्याच्याविरोधात असती तर सरकारने आश्वस्त केल्यानंतर ती थांबायला पाहिजे होती. मात्र, आप आणि काँग्रेस हे पक्ष लोकांना सातत्याने चिथावणी देत आहेत. राज्यघटना आणि तिरंगा समोर ठेवून लोकांपासून मूळ कट लपवला जात आहे. याच लोकांना भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका उपस्थित केली होती. या लोकांना देशाचे तुकडे-तुकडे करायचे आहेत. त्यामुळे आता दिल्लीची जनता अशा लोकांना स्वीकारणार का, असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान आहे. त्यासाठी भाजपकडून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. यासाठी भाजपने आपले ट्रम्प कार्ड बाहेर काढले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुरुवातीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. योगी आदित्यनाथ यांनीही दिल्लीत अनेक सभा घेतल्या होत्या. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मैदानात उतरले आहेत.
दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिलीच प्रचारसभा घेतली. यावेळी मोदींनी दिल्लीकरांना राज्याच्या सर्वतोपरी विकासाचे आश्वासन दिले. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध वसाहतींचा प्रश्न आजवर कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला, असे मोदींनी यावेळी सांगितले.
टॉप हेडलाईन्स
भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश
कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....
लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर