बातमी तुमच्या कामाची : आजपासून बदलत आहेत हे चार नियम
आजपासून काही नियमांत बदल होत आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो
मुंबई : आज १ ऑगस्ट... नव्या महिन्याची सुरुवात आहेच... पण महत्त्वाचं म्हणजे आजपासून काही नियमांत बदल होत आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे हे नियम ठाऊक असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आजपासून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं स्वस्त होतंय तर युनियन बँकेकडून कर्ज घेणंही तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी कमी
इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं आता आपल्या खिशाला परवडू शकणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर यापूर्वी १२ टक्के जीएसटी टॅक्स लावला जात होता. परंतु आजपासून मात्र या वाहनांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अशावेळी तुम्ही एखादी १० लाख रुपये किंमतीची इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर त्यावर तुम्हाला जवळपास ७० हजार रुपयांचा फायदा मिळू शकेल.
'एसबीआय'चा IMPS चार्ज रद्द
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं आजपासून ऑनलाईन फंड ट्रान्सफर मोफत केले आहेत. 'एसबीआय'कडून आयएमपीएस चार्ज रद्द करण्यात आलेत.
'एसबीआय'चे व्याज दर
स्टेट बँक ऑफ इंडियानं फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज दर घटवले आहेत. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर ५० पॉइंटस ते ७५ पॉइंटसपर्यंत घटवण्यात आलेत.
युनियन बँकेचे कर्ज झाले स्वस्त
युनियन बँक ऑफ इंडियानं MCLR आधारित व्याजदरांत कपात केलीय. नवे दर आजपासून लागू होत आहेत. त्यामुळे कर्जधारकांना 'ईएमआय' अर्थात कर्जाचे हप्त्यांत थोडी सूट मिळणार आहे... आणि कर्जही स्वस्त होणार आहे.