खाणीत लपून बसली 25 चोरट्यांची टोळी, पोलिसांचा 36 तासांपासून खाणीबाहेर गराडा
खाणीत केबल चोरण्यासाठी घुसलेल्या सुमारे 25 चोरट्यांच्या टोळीचा लागला छडा
रांची : झारखंडमधील कोळसा खाणीत केबल चोरण्यासाठी घुसलेल्या सुमारे 25 चोरट्यांच्या टोळीचा छडा लागला आहे. माहिती मिळाल्यापासून पोलिसांनी खाणीबाहेर गराडा घातला असला तरी पकडले जाण्याच्या भीतीने चोरटे बाहेर येण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत. पोलिसांच्या तावडीत चोर अडकले आहेत. या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी गेल्या 36 तासांपासून खाणीबाहेर नाकाबंदी करत आहेत, मात्र सशस्त्र चोरटे बाहेर येण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत.
रविवारी रात्री दरोडेखोरांनी खाणीत प्रवेश केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चोरट्यांची एक सशस्त्र टोळी धनबाद जिल्ह्यातील भाग्यलखी कोळसा खाणीत केबल्स चोरण्याच्या उद्देशाने घुसली. एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्लेखोरांची माहिती मिळताच पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याने घाबरलेल्या हल्लेखोरांनी पोलिसांवर बॉम्ब फेकले आणि अनेक राउंड फायर केले. या हल्ल्यात इन्स्पेक्टर अवध बिहारी महतो जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात हल्लेखोरांचे काही नुकसान झाले की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
खाणीबाहेर पोलिसांचा गराडा
वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत घटनास्थळी स्थिती कायम होती. मोठ्या संख्येने पोलीस खाणीबाहेर गराडा घालून उभे आहेत. खदानीत चोरट्यांची टोळी लपून बसली आहे. त्या खाणीत अंधार आहे, कीटकांची भीतीही आहे आणि अन्न-पाण्याचे संकटही आहे. असे असतानाही पकडले जाण्याच्या भीतीने चोरटे बाहेर येण्याचे धाडस दाखवत नाहीयेत.
खाणीत दडून बसलेल्या गुन्हेगारांना बाहेर काढणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सीआयएसएफचे जवान सतत खाणीतून हल्लेखोरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना यश मिळू शकलेले नाही.