गुटखा खाऊन अंगावर थुंकले, नंतर सॉरी म्हणत 3.5 लाख लुटले; चोरांची हैराण करणारी मोडस ऑपरेंडी
रस्त्यावर चालताना एका व्यक्तीकडून 3.5 लाख रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, यावेळी चोरांनी वापरलेली मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
पैसे घेऊन प्रवास करताना किंवा अंगावर दागिने घातलेले असताना रस्त्यांवर पाळत ठेवून असलेल्या चोरांपासून सावधान राहा असं पोलीस वारंवार सांगत असतात. हे चोर अनेकदा रस्त्याच्या किनारी पाळत ठेवून बसलेले असता. एखाद्याला लुटताना ते दरवेळी चाकू किंवा इतर शस्त्राचा धाक दाखवतील असं नाही. सध्याचे चोर अत्यंत शातिरपणे ही चोरी करतात. दरम्यान, असाच एक प्रकार सध्या समोर आला असून, ही मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले आहेत. याचं कारण चोरांनी ही मोडस ऑपरेंडी वापरत दिवसाढवळ्या 3.5 लाख रुपये चोरले आहेत.
बिहारच्या समस्तीपूर येथे हा प्रकार घडला आहे. चोरांनी रस्त्यावरुन चालणाऱ्या एका व्यक्तीकडून 3 लाख रुपये लुटले. सर्वात आधी चोर पीडित व्यक्तीच्या अंगावर थुंकला. नंतर माफी मागण्याचा बहाणा करत त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेत पळ काढला. दिवसाढवळ्या सर्वांसमोर झालेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुटखा खाऊन अंगावर थुंकले
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रमणी राय असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. चंद्रमणी राय बँकेतून 3.5 लाख रुपये काढून घरी निघाले होते. ते सायलवरुन प्रवास करत होते. यावेळी एक दुचाकीस्वार तरुणही तेथून निघाला होता. यावेळी तरुणाने गुटखा खाल्ला आणि चंद्रमणी यांच्या अंगावर थुंकले. यानंतर त्यांना दुचाकी थांबवली आणि माफी मागितलं. तसंच जवळ असणाऱ्या नळाजवळ जाऊन कपडे स्वच्छ करण्याबद्दल सांगू लागले.
कपडे स्वच्छ करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फरार
पीडित चंद्रमणी यांचे कपडे स्वच्छ केले जात असताना, चोराने अत्यंत चालाखीने त्यांच्या बॅगेत ठेवलेले पैसे लंपास केले आणि फरार झाला. चंद्रमणी यांना आपल्याला गंडा घालण्यात आला आहे समजल्यावर पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासलं असता त्यांना दोन तरुण दुचाकीवर संशयितपणे फिरत असल्याचं दिसलं. पोलीस सध्या इतर सीसीटीव्ही देखील तपासत असून चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
चोरांनी अशाप्रकारे चकवा देत पैसे लुटण्याचं प्रकरण तसं नवं नाही. याआधीही चोरांनी अशाप्रकारची मोडस ऑपरेंडी वापरत लोकांना लुटलं आहे. पण गुटखा खाऊन अंगावर थुंकत त्याची माफी मागून लुटण्याचं हे प्रकरण थोडं वेगळं आहे. त्यामुळेच त्याची जास्त चर्चा रंगली आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.