राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी
सुरक्षेच्या बाबतीत सर्वात चांगली मानल्या जाणा-या राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सात डब्यांमधील २० प्रवाशांना चोरांनी लुटले आहे.
नवी दिल्ली : सुरक्षेच्या बाबतीत सर्वात चांगली मानल्या जाणा-या राजधानी एक्सप्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या सात डब्यांमधील २० प्रवाशांना चोरांनी लुटले आहे.
त्यांच्याकडील रक्कम, मोबाईल, सोनं, कपडे सगळं चोरट्यांनी पळवलं आहे. रेल्वे दिल्लीला पोहोचल्यावर याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कोच नंबर ३, ५, ६, ७, १०, ११ आणि A-१ मध्ये रतमल ते कोटा या दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली. प्रवाशांना त्यांच्या बॅग पँट्री कार आणि बाथरुममध्ये आढळून आल्या. काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, याच रेल्वेत दोन दिवसांपूर्वीही चोरी झाली होती. मात्र ती घटना दाबण्यात आली.
ज्यापद्धतीने चोरी झाली त्यावरून असं लक्षात येत आहे की, चोरांना ट्रेनचा पूर्ण अभ्यास होता. अशात संशयाची सुई रेल्वेच्या स्टाफपासून ते कॅटरींग स्टाफ यांच्याकडेही आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.