CM Appointed Son As Deputy CM: देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं होणार आहे की वडील मुख्यमंत्री असताना त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. हा प्रकार घडला आहे तामिळनाडूमध्ये! तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरफार करण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्याच्या राज्यपालांना राज्यसरकारमधील युवा कल्याण आणि क्रिडा मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडे योजना आणि विकास विभाग देण्याबरोबरच त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी या मागण्या मान्य केल्या आहेत. विशेष म्हणजे उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री एक एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. 


या लोकांनाही संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच राज्यपालांकडे उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्याबरोबरच व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी चेझियाना आणि आर. राजेंद्रन यांच्याबरोबरच थिरु एस. एम. नासर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करुन घेण्याची मागणी केली आहे. या नव्या मंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज म्हणजेच रविवारी दुपारी साडेतीन वाजता चेन्नईमधील राजभवनामध्ये पार पडणार आहे. तसेच या शपथविधी सोहळ्यामध्ये तामिळनाडू सरकारमध्ये सेंथिल बालाजी पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. सेंथिल बालाजी यांना काही काळापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 


या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता


केवळ नव्या नियुक्त्याच नाही तर एम. के. स्टॅलिन यांनी दुग्धविकास मंत्री टी. मानो थंगराज, अल्पसंख्यांक कल्याण आणि बिगरनिवासी तमीळ कल्याण मंत्री के. एस. मस्थान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिमंडळातून काढण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी ही मागणीही मंजूर केली आहे. खरं तर एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारीच उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे संकेत दिले होते. 


सनातन धर्मासंदर्भात वादग्रस्त विधान


उदयनिधी स्टॅलिन यांनी उन्मूलन संमेलनामध्ये सनातन धर्माचा विरोध करण्याबरोबरच त्याला संपवलं पाहिजे असं वादग्रस्त विधान केलं होतं. "सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्याविरोधात आहे. काही गोष्टींचा केवळ विरोध करता येत नाही तर त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनासारख्या गोष्टींचा विरोध करत नाही तर त्या संपवतो. तशाच प्रकारे आपल्याला सनातनला संपवलं पाहिजे," असं उदयनिधी म्हणाले होते.



वादावर स्पष्टीकरण


यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना, "माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. मी 'सनातन धर्म उन्मूलन' नावाचा संमेलनामध्ये सहभाग घेतला होता. तिथे मी मोजून पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ बोललो. मात्र भाजपाने माझं भाषण वाढवून चढवून दाखवत खोटी माहिती पसरवली. त्यांनी माझ्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या. माझ्यावर 10 लाखांपासून 10 कोटींपर्यंतची बक्षिसंही घोषित करण्यात आली," असं म्हणत भाजपावर निशाणा साधला होता.