मुंबई : सोमवारी बकरी ईदच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायसा मिळत आहे. देशातील विविध ठिकाणी मुस्लिम धर्मियांनी या निमित्ताने बाहेर येत मशिदीत नमाज अदा केल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील जामा मशिदीतही नमाज अदा करण्यात आली. दिल्ली आणि मुंबईशिवाय देशातील इतर भागांमध्येही ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांनुसार दिल्लीतील पंजा शरीफ दर्ग्यामध्ये भाजप नेते मुक्तार अब्बास नकवी यांनीही नमाज अदा केली. एकिकडे साऱ्या देशात बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा केली जात असतानाच दुसरीकडे अनेकांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे जम्मू- काश्मीर येथील एकंदर परिस्थितीवर. 


काश्मीर खोऱ्यातील सध्याचं वातावरण पाहता सर्वत्र शांततेचा माहोल असून, ईदच्या निमित्ताने य़ेथे लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध आणि कलम १४४ हटवण्यात आलं आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील वस्तू आणि सामानाच्या खरेदीसाठी दुकानं आणि एटीएम सुविधाही सुरु करण्यात आल्या आहेत. आप्तजनांना दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधता यावा यासाठी टेलिफोन बूथही सुरु करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 


देशभरात एकंदर असं आहे ईदचं चित्र.... 







दरम्यान, ईदच्या या उत्साही वातावरणाला गालबोट लावण्याच्या प्रयत्न दहशतवादी संघटनांनकडून होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरच्या विविध भागांमध्ये फिदायीन हल्ल्यांशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यासाठी बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, विमानतळ आणि इतर गजबजलेल्या ठिकाणांना निशाणा करण्यात येणार असल्याचं कळत आहे. परिणामी या वातावरणात सुरक्षा दलांकडूनही लहानमोठ्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत असून, कमालीची सतर्कता बाळण्यात येत आहे.