कार्ती चिदंबरम यांच्या घरी सीबीआयची धाड, हे आहे प्रकरण
देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या निवासी आणि कार्यालयाच्या परिसराची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज धाड टाकली.
नवी दिल्ली : कार्ती चिदंबरम यांच्या मुंबईतील तीन, तामिळनाडूतील तीन आणि कर्नाटक, पंजाब आणि ओडिशामधील प्रत्येकी एका ठिकाणासह नऊ ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.
कार्ती याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खटले आहेत. त्याच्यावर आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात यापूर्वीच आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याला अटक केली होती आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
मात्र, आता 2010 ते 2014 दरम्यान झालेल्या कथित परदेशी पैसे पाठवल्याप्रकरणी सीबीआयने नवीन प्रकरणाची नोंद केली आहे. त्यानुसार ही धाड टाकण्यात आली.
पंजाबमधील एका प्रकल्पावर काम करणाऱ्या काही चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची बेकायदेशीर रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कार्ती आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सुमारे 260 व्हिसा चिनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले होते, अशी माहिती सूत्रंनी दिलीय.
सीबीआयने सकाळी चिदंबरम यांच्या दिल्लीतील 80 लोधी इस्टेट निवासस्थानाची झडती घेतली. घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे जप्त केल्याचे समजते.