तिरुअनंतपुरम: गेल्या अनेक दशकांपासून पाळण्यात येणाऱ्या धार्मिक परंपरेनुसार बुधवारी केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावरील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातून वर्षातून दोनदा अरट्टू ही मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीचा मार्ग तिरुवनंतपुरम विमातळाच्या धावपट्टीवरून जातो. या मिरवणुकीच्यावेळी देव आकाशातून प्रवास करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यासाठी या काळात विमानतळावरील हवाई वाहतूक बंद ठेवली जाते. 


श्री पद्मनाभस्वामी मंदिरातून निघणारी ही मिरवणूक देवाच्या आंघोळीसाठी षणमुगम समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाते. या मार्गात तिरुवनंतपुरम विमानतळाची धावपट्टी आहे. हे विमानतळ तयार होण्यापूर्वी याच मार्गावरून मिरवणूक काढली जात असे. ही प्रथा आजही पाळली जाते. 


देवाची आंघोळ पूर्ण होऊन ही मिरवणूक पुन्हा याच मार्गाने परतल्यानंतर विमानतळ पुन्हा सुरु करण्यात येते. त्यामुळे या काळात विमानांच्या उड्डाणाच्या आणि धावपट्टीवर उतरण्याच्या वेळा बदलण्यात येतात. तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांना विशेष पासेस दिले जातात, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.


त्यानुसार, बुधवारी दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत तिरुअनंतपुरम विमानतळावरील हवाई वाहतूक बंद असेल. परिणामी केरळमध्ये येणाऱ्या एअर इंडिया, इंडिगो आणि जेट एअरवेजच्या सर्व विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.