अहमदाबाद : Valentine`s Day 2019 फेब्रुवारी महिना उजाडला की सुरुवात होते ती म्हणजे एका खास दिवसाच्या तयारीची. मुळात हा दिवस सगळ्यांसाठीच खास असतो असं नाही. पण, प्रेम करणाऱ्यांसाठी तो नक्कीच खास  असतो. अगदी बरोबर... इथे चर्चा सुरू आहे प्रेम ही सुरेख भावना साजरा करणाऱ्या व्हॅलेन्टाईन्स डे या दिवसाची. आपल्या आयुष्यातील खास, प्रेमाच्या व्यक्तीचं स्थान आणि त्यांचं महत्त्व साजरा करत नात्यातील बंध आणखी दृढ करणारा हा दिवस. बऱ्याच प्रेमी युगुलांसाठी हा दिवस म्हणजे परवणीच. पण, या दिवशी ज्यांच्यासोबत कोणीच नाही, थोडक्यात काय तर आजच्या भाषेत सांगावं तर जे 'सिंगल' आहेत त्यांचं काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने प्रेमी युगुलांसाठी जिथे घसघशीत सवलती आणि अनेक पर्याय उपलब्ध असतात तिथेच या दिवशी सिंगल म्हणवणाऱ्यांनाही वगळल्यासारखं वाटू नये यासाठी एका कॅफेकडून अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. अहमदाबाद येथील वस्त्रपूर भागात असणाऱ्या 'एमबीए चायवाला' या आगळ्यावेगळ्या कॅफेवजा ठिकाणी सिंगल असणाऱ्यांना व्हलेन्टाईन्स डेच्या दिवशी सायंकाळी मोफत चहा दिला जाणार आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत सिंगल असणाऱ्यांना ही चाय डेट अनुभवता येणार आहे. 



सोशल मीडियावर सध्या हा 'एमबीए चायवाला' म्हणजेच प्रफुल बिलोर नावाचा हा तरुण आणि त्याने फेसबुकवर पोस्ट केलेला त्याचा मोफत चहाचा 'Why should couples have all the fun?' हा इव्हेंट बराच चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण म्हणजे कॅफेचं नाव. एमबीएचं शिक्षण घेतलेला प्रफुल हा सर्व व्यवहार आणि त्याचा कॅफे सुरेखपणे सांभाळत आहे. त्याच्या या प्रवासात सुरुवातीला बरेच अडथळेही आले.  नातेवाईक आणि समाजाच्या विरोधाचाही त्याला सामना करावा लागला. अवघ्या ८ हजार रुपयांवर सुरु केलेला हा व्यवसाय त्याने टप्प्याटप्प्याने वाढवला आणि त्यात जम बसवला. याच प्रवासात आज तो एका अशा टप्प्यावर आला आहे जेथे व्हलेटाईन्स डेच्या निमित्ताने त्याला कॅफे आणि खुद्द प्रफुल चर्चेच आला आहे.