मुंबई : भारत- पाकिस्तान, या दोन्ही देशांमध्ये सद्यस्थितीला असणारं एकंदर तणावाचं वातावरण पाहता हे सर्व थांबणार तरी कधी हाच प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. दहशतवाद, अनेक वर्षांपासूनच्या शत्रुत्वाच्या आगीचा दाह सोसणारे या दोन्ही देशांचे नागरिक आणि दर दिवसागणिक बिघडणारी समीकरणं या सर्व परिस्थितीवर अवघ्या दीड मिनिटांच्या या व्हिडिओमधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. #SayNoToWar या नावाने सृष्टी तेहरी या युट्यूबरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काश्मिर, भारत, पाकिस्तान.... हे तीन शब्द ऐकल्यावर आपण जरा विचित्रपणेच व्यक्त होतो', या ओळीने व्हिडिओची सुरुवात होते आणि यासंबंधीच्या प्रश्नातच आपण डोकावू लागतो. अतिशय सुरेख असा हा व्हिडिओ प्रेक्षकांना काश्मिरच्या गल्लीबोळात नेतो. जिथे खऱ्या अर्थाने या काश्मिरी नागरिकांच्या आयुष्य़ाची झलक पाहायला मिळते. एकिकडे जिथे संपूर्ण देशात काही ठिकाणी काश्मिरी नागरिकांना इतर भारतीय जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, तिथेच हा व्हिडिओ म्हणजे एक नागरिक म्हणून अनेक जबाबदाऱ्यांची जाणिव करुन देतो. 


काश्मिरच्या खोऱ्यातील नागरिकांकडे पाहण्याचा दूषित दृष्टीने पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम हा व्हिडिओ करत आहे. मला डॉक्टर व्हायचंय असं म्हणणारा एक सर्वसामान्य काश्मिरी मुलगा ज्या आशेने त्याच्या स्वप्नाविषयी सांगतो, ते पाहता या मुलांच्या स्वप्नांना भरारी मिळणार की नाही हा वास्तववादी प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो. काश्मिरच्या खोऱ्यात राहणाऱ्या मुलांचीही काही स्वप्न आहेत. मोठं होऊन, आयुष्यात त्यांनीही फार पुढे जायचं आहे. काहीतरी कर्तृत्तव करून नाव कमवायचं आहे. इथे असणाऱ्या सर्वांनाच दहशतवादी व्हायचं नाही आहे, हाच मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे.  


पर्यटकांसाठी परवणी असणाऱ्या देशाच्या या नंदनवनात म्हणजेच काश्मिरमध्ये सध्या भाषा सुरू आहे ती सूडाची, हल्ल्याची, चकमकीची. पण, मुळात काश्मिरच्या खोऱ्यात राहणारी ही लोकं किती प्रेमळ आहेत, पर्यटकांना ते किती आपुलकीने स्वत:च्याच कुटुंबाता एक भाग मानतात, याचा अनुभव घेतला आहे का कधी? नाही.... तर मग हा व्हिडिओ तुम्हाला त्याची एक झलक दाखवून जाईल.  



हिंसाचार, सततच्या दहशतवादी कारवाया, साऱ्या देशाच्या रोखलेल्या नजरा ही आव्हानं आता नाईलाजाने खोऱ्य़ात राहणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. पण, यावर युद्ध हा एकच पर्याय नाही. शत्रूला संपवण्यासाठी देशवासियांनाच निर्दयीपणे वागणूक देऊन चालणार नाही, हे व्हिडिओतून प्रतित होतं. 'दिवसभर ते कसून मेहनत करतात. कोणी पोटाची खळगी भरण्यासाठी, कोणी शिकण्यासाठी... पण, तुमच्याआमच्यासरखं रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे गाढ झोपी ते कधीच जात नाहीत', ही ओळ व्हिडिओची सांगता करताना दाहक वास्तव आपल्या समोर ठेवते. शिवाय इथले सर्वच नागरिक दहशतवादी नाहीत हेसुद्धा पोटतिडकीने सांगते. अखेर 'सर्वचण दहशतवादी नाहीत. त्यामुळे जर तुम्ही युद्धाची मागणी करत असाल तर या काश्मिरी लोकांपैकी एकाच्या मृत्यूला तुम्हीही जबाबदार असाल...' ही बाब अधोरेखित करत युद्ध हा कधीच एक चांगला पर्याय नसल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट करण्यात आलं आहे.