लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यूपी 112 कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा संदेश मिळताच अधिकारी सतर्क झाले आहेत. पोलीस पथक संशयास्पद नंबरची चौकशी करत आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी 7.58 ला उत्तर प्रदेश पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर अज्ञात क्रमांकावरून हा संदेश आला. संदेशामध्ये सीएम योगी यांना पाचव्या दिवशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने संदेशात म्हटले आहे की, चार दिवसात माझं काय करता येत ते करुन घ्या. या संदेशाची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी कंट्रोल रूमचे मुख्यालय प्रमुख अंजुल कुमार यांना दिली. अंजुल कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी एडीसी सुरक्षा मुख्यालयासह अन्य अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.


पोलीस अधिकारी त्वरीत हरकतीमध्ये आले. यानंतर धमकीच्या नंबरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिका-यांनी या क्रमांकाच्या मालकाची माहिती आणि लोकेशन तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. 


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबर, सप्टेंबर आणि मेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देण्यासाठी 112 वर कॉल केला गेला होता.