Child Died due to Suffocation: मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवावं लागतं. त्या वयात अनेक गोष्टींचं कुतुहूल आणि अज्ञान असल्याने अनेकदा ते आपला जीव धोक्यात टाकण्याची भीती असते. म्हणूनच ते कळते होईपर्यंत ते काय खातात यापासून ते प्रत्येक छोट्या गोष्टींवर पालकांना करडी नजर ठेवावी लागते. त्यांच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अशीच एक घटना समोर आली आहे. आई-वडिलांचं दुर्लक्ष झाल्याने एका 3 वर्षाच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेली येथे खेळता खेळता एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. बिशारतगंजमधील भगवतपूर गावात ही घटना घडली आहे.  येथे एक चिमुरडी खेळता खेळता कारमध्ये अडकली होती. पण तिच्या आई-वडिलांना याची काहीच कल्पना नव्हती. 


जीवघेण्या गर्मीत खेळत असताना चिमुरडी कारमध्ये जाऊन बसली होती. यावेळी कार बंद झाल्याने तिला बाहेर येता आलं नाही. बराच वेळ कारमध्ये अडकून राहिल्याने अखेर श्वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला. 


घऱात मुलगी दिसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आई-वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत कारमध्ये पडलेली होती. यानंतर ते तात्काळ मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ माजली. मुलीच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गंगेच्या किनारी मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी खेळत होती तेव्हा कारचा दरवाजा उघडा होता. खेळता खेळता मुलगी कारमध्ये गेली आणि ऑटो लॉकने कार बंद झाली. आतमध्ये अडकल्यानंतर मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. पण काचा बंद असल्याने तिची आर्त हाक कोणालाही ऐकू आली नाही. 


बाहेर जीवघेणा उकाडा असताना आतमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होत गेल्याने गुदमरुन चिमुरडीचा मृत्यू झाला. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 


2 वर्षाच्या चिमुरडीचा कारमध्ये मृत्यू


काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये भीषण गर्मीत कारमध्ये अडकल्याने एका 2 वर्षाच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. जवळपास 15 तास ही चिमुरडी कारमध्ये अडकलेली होती. पोलिसांनी याप्रकरणी वडील क्रिस्टोफर मकलीन आणि आई कॅथरीन एडम्स यांना बेड्या ठोकल्या आहेत. चिमुरडीच्या शरिराचं तापमान 41.6 सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. कारमध्ये 4 वर्षाचा मुलगाही बंद होता. पण तो वाचला आहे. त्याला सध्या बालसंरक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं आहे. 


मुलं कारमध्ये झोपलेली असताना महिला त्यांना सोडून गेली होती. यानंतर ती त्यांना विसरली होती. दोन्ही मुलं दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत कारमध्ये होती. 16 मे रोजी ही घटना घडली आहे.