तामिळनाडू : तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील नादुकट्टपुट्टीमध्ये शुक्रवारी 25 फूट खोदलेल्या बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षीय सुजीत विल्सनचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांनी सुजीतचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. शुक्रवारपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दलाकडून मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजीत विलसन बोअरवेलमध्ये पडला. पडल्यावर तो ३० फुटांवर अडकला. पण नंतर मुलगा आणखी खाली जात जवळपास १०० फुटांवर अडकला. बोअरवेल निकामी झाल्यानंतर ते तसंच खुलं ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. 



सुजीतचं शरिर कुजलेल्या स्वरूपात आढळलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोअरवेलमधून दुर्गंध येऊ लागला. विल्सनचं शरीर बोअरवेलमध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर काढण कठीण झालं होतं. मृतदेह हाती आल्यानंतर खोदकाम थांबवण्यात आलं. 



शुक्रवारपासून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. सुरुवातीला मुलापर्यंत पोहचण्यासाठी बोअरवेलजवळ खड्डा खोदण्यास मशीन्स मागवण्यात आल्या. परंतु तो भाग खडकाळ असल्याने, तसंच खड्डा खोदताना कंपने तयार होत असल्यामुळे ते काम थांबविण्यात आलं. यामुळे माती अधिक बोअरमध्ये जाऊन, मुलगा आणखी खोलवर जाण्याचा धोका होता. त्यामुळे खड्डा खोदण्याचं काम थांबण्यात आलं. अखेर 2 वर्षीय सुजीतचा मृत्यू झाला. 



या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोकाकूळ वातावरण आहे. बोअरवेलचा भाग उघडा कसा राहिला? असा प्रश्न साऱ्यांना पडत आहे.