दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (TMC MP Mahua Moitra) त्यांच्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. संसदेतील त्यांची बेधडक भाषणे कायम गाजली आहेत. त्यानंतर आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महुआ मोइत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. महागाईवरुन सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, खासदार मोइत्रा त्यांच्या लुई व्हिटॉन ब्रँडची (Louis Vuitton) पर्स खाली ठेवताना दिसल्या होत्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमूलच्या (TMC) खासदार काकोली घोष दस्तीदार महागाईवर बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या मोइत्रा त्यांची बॅग शेजारच्या सीटवरून टेबलाखाली पायाजवळ ठेवताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. माध्यमांच्या वृत्तानुसार लुई व्हिटॉनची बॅग होती ज्याची किंमत 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे.



यानंतर आता महुआ मोईत्रा यांनी आपली पर्स बदलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. याबाबत महुआ मोइत्रा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.


खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवर याबाबत खुलासा केला आहे. ट्विट करत मोइत्रा यांनी एका न्यूज पोर्टलला उत्तर दिले आहे. यावेळी देखील त्यांची बॅग लुई लुई व्हिटॉनची आहे, असे मोइत्रा म्हणाल्या.  न्यूज पोर्टलने महुआ मोइत्रांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत तुमची फॅशन सेन्स बदलली आहे का? असा सवाल केला होता.


त्या ट्विटला मोइत्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "माझ्या प्रिय मित्रांनो ही देखील लुई व्हिटॉन - द पाउच आहे. यावरुन शोधा म्हणजे तुमचा वेळ वाचेल. मी ज्या गाडीतून उतरत आहे ती जी-बॅगन आहे. त्या कारची नंबर प्लेट आंध्र प्रदेशची आहे. ही गाडी आंध्र प्रदेशातील एका खासदाराची आहे ज्यांच्यासोबत आम्ही अनेकदा कार-पूल करतो. तुमच्या हेरगिरीचा मी थोडा वेळ वाचवला. चिअर्स!" असे मोइत्रा यांनी म्हटले.



या उत्तरावर एका यूजरने महुआ मोईत्रांना विचारले की पाण्याच्या बाटलीबाबत काय सांगाल? यावर मोइत्रा यांनीही उत्तर दिले. "सामान्यत: मी अमेरिकेतून कॉन्टिगोच्या बाटल्या विकत घेते. पण या मला माउंट होक्योकच्या एका वर्गमित्राने दिली होती."



दरम्यान, यावेळीही महुआ मोइत्रा लुई व्हिटॉन टोट बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या. या बॅकची किंमत खूप जास्त आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या बॅकची किंमत2,910 डॉलर म्हणजेच 2,28,728 रुपये आहे.