नवी दिल्ली : 'सभी का खून है शामिल है यहाँ मिट्टी में... किसी के बाप हिंदुस्तान थोडी हैं!' म्हणत मंगळवारी संसदेत भाजपला धारेवर धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नवनिर्वाचित खासदार महुआ मोइत्रा यांनी पहिल्याच भाषणासाठी अनेकांकडून वाहवा मिळवली. महुआ मोइत्रा यांचं सात मुद्द्यांसहीत संसदेतील १० मिनिटांचं दमदार आणि शानदार भाषण या आठवड्यातील चर्चेचा विषय ठरलंय. त्यांचं हे भाषण सोशल मीडियावरही भलतंच व्हायरल झालंय. आपल्या भाषणात त्यांनी मोदींच्या सरकारवर देशाला 'एकाधिकारशाही'कडे घेऊन जाण्याचा आरोप करत 'हे हुकूमशाहीचे (फॅसिझम) सुरुवातीचे संकेत आहेत' असं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिक विचारांना मागे टाकून केवळ 'राष्ट्रवादा'च्या नावावर देशाचं विभाजन करण्याचाही प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केलीय. या सरकारला २.७७ एकर जमिनीची (अयोध्या) चिंता आहे पण संपूर्ण देशाची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी प्रसिद्ध कवि रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेचाही उल्लेख केला. 'हां हां दुर्योधन बांध मुझे. बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है?...सूने को साध न सकता है, वह मुझे बांध कब सकता है?'


'एकाधिकारशाही आणि मेजोरिटेरियनिजन (बहुसंख्यांकवाद) एकमेकांशी निगडीत आहेत. इथं हे मानलं जातं की आपण जो विचार करतो तोच योग्य आहे बाकी सर्व चुकीचं आहे... आणि त्यालाच अनेकदा जनसमर्थन मिळतं... जसं सध्या सुरू आहे' असं म्हणत त्यांनी 'होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम'च्या मेन लॉबीमध्ये २०१७ साली प्रदर्शित करण्यात आलेल्या एका पोस्टरचा उल्लेख केला. जर्मनीत १९४० च्या दशकात नाझी हुकुमशाही दरम्यान यहुद्यांची सामूहिक हत्येच्या स्मरणार्थ हे मेमोरियल उभारण्यात आलंय. तिथे असलेल्या पोस्टरवर एकाधिकारशाहीच्या संकेतांची एक यादीच आढळते.


'होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम'मधलं पोस्टर

'आपला इशारा एखाद्या मोठ्या जनसंहाराकडे नाही परंतु, इतका मोठा जनादेश ध्यानात घेऊन केवळ या मुद्यांबद्दल माहिती देणं ही आपली जबाबदारी आहे... आपल्याकडेही एकाधिकारशाहीचे सुरुवातीचे संकेत दिसत आहेत' असं महुआ यांनी यावेळी म्हटलं.



कोण आहेत महुआ मोइत्रा?


- महुआ मोइत्रा यांनी २००८ मध्ये काँग्रेससोबत राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. परंतु, नंतर २०१० मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महुआ मोइत्रा या पश्चिम बंगालच्या कृष्णानगर लोकसभा मतदार संघातून निवडून आल्यात. त्यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांना जवळपास ६३,००० मतांनी पछाडलं. 


- महुआ मोइत्रा यांनी लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनी जे पी मॉर्गनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम पाहिलंय. 


- तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा २०१६ मध्ये करीमपूरहून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. 


- २०१६ पासून महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत


- महुआ मोइत्रा यांनी माउंट होल्योके महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी मिळवलीय.