VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड
Opposition MPs suspension : संसदेच्या आवारात निलंबित खासदारांकडून आंदोलन सुरु होतं. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. नक्कल केल्याने भडकलेल्या जगदीप धनखड यांनी विरोधकांना चांगलेच सुनावलं आहे.
Opposition MPs suspension : नव्या संसद भवनात चार तरुणांनी केलेल्या घुसखोरीवरुन विरोधक आक्रमक झाले आहे. संसदेतील सुरक्षाभंगावरुन सोमवारी खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात निलंबित खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन सुरु केले आहे. मात्र आता या आंदोलनावरुन आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड चांगलेच संतापले आहेत. सभापती जगदीप धनखड यांनी संसदेबाहेर सुरु असलेल्या आंदोलनावरुन या लोकांना सद्बुद्धी मिळो असे म्हटलं आहे.
सभागृहातल्या गोंधळामुळे सोमवारी 78 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निलंबित खासदार सभागृहाच्या पायऱ्यांजवळ बसून विरोध करत होते. त्याचवेळी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून सभागृह चालवण्याच्या त्यांच्या पद्धतीची खिल्ली उडवली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा राहुल गांधीसुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी ही घटना त्यांच्या मोबाईल कॅमेरात देखील कैद केली.
नेमकं काय घडलं?
हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलेले विरोधी खासदार संसदेच्या संकुलात आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत गांधी पुतळ्यासमोर घोषणाही दिल्या. यानंतर ते संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चर्चा करत होते. त्याच वेळी, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल केली, ज्यामुळे उपराष्ट्रपती संतप्त झाले. कल्याण बॅनर्जी यांनी खिल्ली उडवल्याचे पाहून अनेक विरोधी खासदार हसत राहिले. याशिवाय राहुल गांधीही हसत होते आणि काही वेळाने त्यांनी खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
ही घटना लज्जास्पद असल्याचे सांगून उपराष्ट्रपती धनखड यांनी संताप व्यक्त केला. एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे, असे जगदीप धडखड म्हणाले. जगदीप धनखड यावेळी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र राहुल गांधी हेच व्हिडिओ बनवत होते. त्यामुळे ते राहुल गांधींवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाले जगदीप धनखड?
"मी नुकतंच एका टीव्ही चॅनलवर पाहिले की, एक खासदार अध्यक्षांची खिल्ली उडवत होता आणि तुमचा एक मोठा नेता त्याचा व्हिडिओ बनवत होता. त्यांना बुद्धी मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. अध्यक्षपद वेगळे आहे. राजकीय पक्ष एकमेकांच्या बाजूने किंवा विरोधात सामना करू शकतात. मात्र सभापतींना यापासून दूर ठेवले पाहिजे," असे उपसभापती जगदीप धनखड म्हणाले.
लोकसभेतून सुप्रिया सुळेही निलंबित
दरम्यान, मंगळवारी देखील लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 49 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतून आज 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. आतापर्यंत अधिवेशनात एकूण 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.