Couple Hijacked Truck Carrying Tomatoes: बंगळुरुमधील एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेचं कारण फारच आश्चर्यचकित करणारं आहे. बुधवारी पोलिसांनी केलेल्या या अटकेचं कारण आहे टोमॅटो चोरी. या दोघांनीही तब्बल साडेतीन लाख रुपयांचे टोमॅटो चोरल्याची माहिती समोर आली आहे. 5 जणांनी मिळून टोमॅटोची वाहतूक करणारी एक छोटा टेम्पो ट्रकच पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार बंगळुरुमधील आरएमसी यार्ड परिसरामध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


नवरा-बायकोचा प्लॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव भास्कर असं असून या प्रकरणामध्ये भास्करची पत्नी सिंधूजाही आरोपी आहे. हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चोरीची ही घटना 8 जुलै रोजी घडली होती. या 5 जणांनी टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला. काहीजण कारमध्ये होते तर दोघेजण दुचाकीवर होते. काही अंतर पाठलाग केल्यानंतर या पाच जणांनी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याचा बनाव केला आणि चालकाचं लक्ष वेधून संपूर्ण ट्रकच चोरला. भास्कर आणि सिंधूजा या दोघांनीच टोमॅटोचा ट्रक चोरण्याचा प्लॅन तयार केला होता. यामध्ये त्यांनी रॅकी, कुमार आणि महेश यांनाही सहभागी करुन घेतलं.


अपघाताचा बनाव


"या लोकांनी आपलं वाहन या ट्रकसमोर आडवी घातली आणि ट्रकने धडक दिल्याचा दावा करत ट्रकमधील शेतकऱ्याशी आणि हा मालवाहू बुलेरो ट्रक चालवणाऱ्याशी रस्त्यातच वाद घालू लागले. झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी या आरोपींनी ऑनलाइन माध्यमातून पैसे द्यावेत असं या ट्रकचालकाला आणि शेतकऱ्याला सांगितलं," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


तामिळनाडूच्या दिशेने पळाले


"आरोपी पैसे ट्रान्सफर करा असं सांगत या टोमॅटोने भरलेल्या ट्रकच्या बाजूला जाऊन उभा राहिला. दुसरीकडून त्याचा सहकारी चालकाच्या जागेवर जाऊन बसला. वाद घालता घालता या दोघांना धक्का देऊन हे तिघे ट्रक घेऊन पसार झाले," असंही पोलिसांनी सांगितलं. हे आरोपी ट्रक घेऊन तामिळनाडूच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या चोरीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मात्र हे चोर नंबर प्लेट नसलेल्या कारमधून आले होते. म्हणूनच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना अधिक तपास करावा लागला. 



2.5 टन टोमॅटो


या प्रकरणामध्ये कलम 346A (अपहरण) आणि कलम 392 (चोरी) गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. या पाच जणांनी चोरलेल्या ट्रकमध्ये 2.5 टन टोमॅटो होते अशी माहिती समोर आली आहे. या शेतमालाची किंमत साडेतीन लाख रुपये इतकी आहे. आरोपींनी जिथून ट्रक चोरला त्याच परिसरामध्ये नंतर तो रिकामा ट्रक आणून पार्क केल्याचंही सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.