नागपूर: बलात्काराच्या घटना रोखायच्या असतील तर विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवायला पाहिजेत, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते गुरुवारी नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांविषयी भाष्य करत असताना दुष्ट आणि सुष्ट व्यक्तींमधील फरक समजावून सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरची भाजपमधून हकालपट्टी


दुष्ट प्रवृत्तीचे लोक ज्ञान, सामर्थ्य आणि संपत्तीचा गैरवापर करतात. भारतात पूर्वीच्या काळी घरांमध्ये कन्या पूजा केली जायची. मात्र, आता देशात काय घडत आहे? दुष्ट लोक महिलांवर अत्याचार आणि खून करत आहेत. सामर्थ्य हे गैरवापर करण्यासाठी असते का रक्षणासाठी? हाच भेद समजण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवले पाहिजेत. जेणेकरून बलात्कारासारख्या घटना घडणार नाहीत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. 


नागपूर विद्यापीठात जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचे राज्यपाल आणि कुलपती असणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या भवनासाठी राहुल बजाज यांनी १० कोटीचा सामाजिक दायित्व निधी दिला आहे. यासाठी राज्यपालांनी बजाज कुटुंबीयांचे कौतुक केले. संतांची समाजाप्रतीची निष्ठा ही अमूल्य आहे. मात्र, जेव्हा एखादा उद्योगपती संतवृत्तीने वागतो तेव्हा शिक्षणासाठी मदत होते, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.



दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. संस्कृत भाषेची महती सांगताना यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी अजब विधाने केली आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार गणेश सिंह यांनी संस्कृत भाषा बोलण्याने मज्जासंस्था (नर्वस सिस्सम) तंदुरुस्त राहते, असा दावा केला होता. तसेच संस्कृतमुळे डायबिटीस आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासही मदत होते, असा जावईशोधही गणेश सिंह यांनी लावला होता.


'संस्कृत भाषेमुळेच संगणक क्षेत्रात मोठी क्रांती होईल'