बंगळुरु : कर्नाटकाच्या मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेऊन जेमतेम २४ तास पूर्ण होत असताना येडियुरप्पांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे.  आज सकाळी साडे दहा वाजता राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या निमंत्रणाविरोधात काँग्रेस आणि  जेडीएसच्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. बुधवारी रात्रभर चाललेल्या सुनावणीच्या शेवटी न्यायालयानं भाजपकडे राज्यपालांना १५ आणि १६ मे रोजी सादर केलेल्या सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पत्रांची प्रत मागितली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए के सिकरींच्या अध्यक्षतेखालाचं त्रिसदस्यीय खंडपीठ पुढे सुनावणी सुरू करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शपथविधीला स्थगिती नसल्यानं काल येडियुरप्पांनी एकट्यानंच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपालांनी येडियुरप्पांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.  राज्यपालांच्या याच निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस वकील अभिषेक मनू सिंघवी, भाजपचे वकील मूकुल रोहतगी  आणि राज्यपालांचे वकील म्हणून अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल युक्तीवाद करतील.



दरम्यान, कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांच्या शपथविधीनंतरही सत्तासंघर्ष सुरुच आहे. शपथविधीनंतर आता बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार आणि राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे. या सगळ्यात दगाफटका होऊ नये म्हणून  काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार कर्नाटकबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार हे कोच्चीला रवाना झाले.


तर दुसरीकडे कर्नाटकात बहुमतासाठी आघाडी करूनही सत्तेपासून दूर ठेवल्यानं काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भाजपविरोधात सक्रीय झाले आहेत. गोव्यात भाजपचा वचपा काढण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केलीय. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं अशी मागणी गोवा काँग्रेसनं केलीय. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यासाठीही हालचारी सुरू केल्या आहेत. 


गोव्यापाठोपाठ मणिपूर आणि मेघालयातही काँग्रेस मोठा पक्ष असल्यानं त्याठिकाणीही राज्यापालांची भेट घेणार आहे.  तर दुसरीकडे बिहारमध्येही राष्ट्रीय जनता दलनं सर्वात मोठा पक्ष असल्यानं राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतलाय. आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. कर्नाटक राज्यपालांच्या  निर्णयानंतर विरोधक सक्रीय होऊ लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.