नवी दिल्ली: एकीकडे भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या आकेडवारीनुसार, आतापर्यंत देशातील ५,१५,३८५ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच जास्त आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे २,३१,९७८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. देशपातळीवरील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २७,११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे. 



देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. अनलॉक-१ नंतर महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.