शेतकरी आंदोलन : देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं दिल्लीत आयोजन
एकीककडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं (Tractor Parade) दिल्लीत आयोजन केले आहे.
नवी दिल्ली : एकीककडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं (Tractor Parade) दिल्लीत आयोजन केले आहे. जवळपास दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात (New Agriculture Laws) आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. मात्र या आंदोलनाबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे(Tractor Rally) आयोजन केले आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातूनही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात 2.5 लाख ट्रॅक्टरसह सहा लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. मात्र, दुसरीकडे मोर्चात फक्त 5 हजार ट्रॅक्टर आणि तितच्याच संख्येने आंदोलक सहभागी होऊ शकतात, तशी परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तिन्ही मोर्चे दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत काढले जाणार आहेत.
मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त
गेल्या आठवडाभरात चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्यात. मात्र, तोडगा काढण्यात आलेला नाही. पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाना परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे दूर केले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली.
दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवरून मोर्चा काढण्यास परवानगी देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी ती नाकारली. ट्रॅक्टर मोर्चासाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पाकिस्तानात 13 ते18 जानेवारी या पाच दिवसांत 300 ट्विटर खाती तयार करण्यात आली आहेत. याच्या माध्यमातून अफवा पसरवून ट्रॅक्टर मोर्चामध्ये अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी दिल्ली पोलिसांनी माहिती आहे. त्यामुळे अधिक दक्षता घेण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिली.
1 फेब्रुवारी रोजी संसदेवर धडक मोर्चा
नवीन तिन्ही शेती कायदे रद्द (New Agriculture Laws) करावेत आणि किमान आधारभूत मूल्याला कायद्याची हमी द्यावी यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे. गेले दोन महिने हे आंदोलन सुरु आहे. चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्यात. मात्र, तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. तर 1 फेब्रुवारी रोजी संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शनपाल यांनी सोमवारी दिली. शुक्रवारी 29 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.