झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेन प्रवाशांच्या अंगावरुन गेली; 2 ठार, अनेक जखमी
झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून, काहीजण जखमी आहेत.
झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जामतारा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मुजीबुर रहमान यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 140 किमी अंतरावर कलझारियाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन मृतदेह हाती लागले आहेत. सध्या सर्च ऑपरेशन सुरु असून मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 7 वाजता हा अपघात झाला असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली आहे. नंतर प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं. सुरुवातीला दोघांचे मृतदेह हाती लागले. पण अंधार असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
"विद्यासागर-कसितार दरम्यान जाणारी ट्रेन क्रमांक 12254 (अंगा एक्सप्रेस) ER (पूर्व रेल्वे) च्या आसनसोल विभागात संध्याकाळी 7 वाजता एसीपी (अलार्म चेन पुलिंग) मुळे थांबली ualr. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी ट्रॅकवरून चालत असलेल्या दोन व्यक्ती MEMU ट्रेनच्या समोर आले होते. ट्रेन जिथे थांबली होती तिथून किमान दोन किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली”, अशी माहिती पूर्व रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या
मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर-यशवंतपूर ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी चेन खेचली. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. यावेळी काही प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. याचवेळी आसनसोल येथून ट्रेन जात होती. तिने या प्रवाशांना उडवलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेची दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. "झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेक लोकांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करते," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. झारखंडच्या जामतारा येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दु:ख झालं. ज्यांनी आपले लोक गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं ते म्हणाले आहेत.