Trains Tied To Railway Track With The Help Of Chains And Locks Video: आतापर्यंत तुम्ही सायकल, दुचाकी साखळी आणि कुलूप लावून बांधून सुरक्षित ठेवल्याचं अनेकदा पाहिलं असेल. तुम्ही स्वत:ही असा प्रकार केला असेल. रेल्वेच्या प्रवाशामध्ये अनेकजण आपल्या बॅगा साखळी आणि कुलूपाच्या मदतीने बांधून ठेवतात. रात्री झोप लागली किंवा एकंदरितच लांबच्या प्रवासात कोणी बॅग उचलून पळ काढू नये या उद्देशाने साखळी आणि कुलूप लावून बॅगा सुरक्षित ठेवल्या जातात. मात्र तुम्ही कधी ट्रेन साखळीने रुळाला बांधून ठेवल्याचं ऐकलं आहे का? नाही ना. खरं तर याचा विचार करुनच हसू येतं. पण असं खरोखर भारतीय रेल्वेने एका राज्यात केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून यामागे एक विशेष कारण आहे. 


120 किलोमीटर वेगाने वाहणार वारे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या पूर्व किनारपट्टीला 'दाना' चक्रीवादळाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेलं 'दाना' चक्रीवादळ रौद्र रूप धारण करू लागले आहे. आता हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत असून त्याचा फटका पश्चिम बंगाललाही बसणार आहे. ओडिशामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला या वादळाचा फटका बसणार आहे. सध्या या वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळत आहे. या वादळाचा लॅण्ड फॉल होईल तेव्हा म्हणजेच हे किनारपट्टीला धडकेल तेव्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हे वादळ किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वारे ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.  म्हणूनच रेल्वेने डब्ब्यांचं अधिक नुकसान होऊ नये, हे वाऱ्यामुळे रुळावरुन सरकून खाली पडू नये म्हणून एक भन्नाट क्लुप्ती वापरली आहे.


गाड्या बांधून ठेवल्याचा व्हिडीओ


पश्चिम बंगालमधील हावरा येथे सुरक्षेचा उपाय म्हणून शालीमार रेल्वे स्थानकामध्ये चक्क रेल्वेचे डब्बे रुळांना साखळ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. लोखंडी साखळ्या आणि टाळे वापरुन ट्रेनचे डब्बे रुळांना बांधून ठेवत असल्याचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे. अशाप्रकारे साखळ्या आणि टाळ्यांच्या मदतीने ट्रेनचे डब्बे रुळांना बांधून ठेवल्याने दाना वादळादरम्यान वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ट्रेनचे डब्बे रुळांवरुन घसरणार नाहीत याची काळजी घेण्यात आल्याचं एएनआयने म्हटलं आहे. 



300 अधिक गाड्या रद्द...


‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी एक्स्प्रेस आणि स्थानिक मार्गावरील 300 हून अधिक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेने 170 हून अधिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या तीव्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत, असे वृत्तसंस्था पीटीआयने एका अधिकाऱ्याचे नाव न सांगता सांगितले. रद्द केलेल्या गाड्या 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान रवाना होणार होत्या.