सहलीला जायचंय, विमानतळाजवळच असणाऱ्या `या` हिल स्टेशनना जायचा बेत कसा वाटतोय?
नियमांमध्ये अडकलेलं जगणं या साऱ्यातून वेळ काढत तुम्हीही काही निवांत क्षणांच्या शोधात आहात का?
मुंबई : ठराविक वेळात असणारी नोकरी, ठरलेल्या वारी मिळणारी आणि ठरलेल्या दिवसांपुरताच मिळणारी सुट्टी या साऱ्या दैनंदिन जीवनाचा एका क्षणाला इतका कंटाळा येतो की कुठेतरी दूर पळून जावंसं वाटतं. दिवसांतून एकदातरी आपल्या ओळखीतलं कोणीतरी हे वाक्य म्हणताता दिसतं. किंबहुना आपण स्वत:सुद्धा हे वाक्य कित्येकदा म्हणतोच.
कोरोनामुळे लागलेलं लॉकडाऊन, त्यानंतरचं नियमांमध्ये अडकलेलं जगणं या साऱ्यातून वेळ काढत तुम्हीही काही निवांत क्षणांच्या शोधात आहात का?
वेळ न दवडता आणि फार मोठी सुट्टी न मागता अगदी सहजपणे तुम्हाला अशा ठिकाणांवर जाता येईल. विमानतळापासून अगदी नजीकच असणारी अशी पर्यटनस्थळं आहेत...
गुलमर्ग- श्रीनगरपासून हे ठिकाण 50 किमी अंतरावर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही टॅक्सीची मदत घेऊ शकता. विमानमार्गाने श्रीनगर आणि त्यानंतर थेट गुलमर्गच्या बर्फाच्छादित प्रदेशात जाणं कधीही उत्तम पर्याय.
मसूरी- डोंगररांगांची राणी, म्हणून मसुरीला ओळखलं जातं. दिल्लीपासून हे ठिकाण बरंच जवळ आहे. तर, जॉली ग्रँट या विमानतळापासून या ठिकाणाचं अंतर 54 किमी इतकं आहे.
शिलाँग- स्कॉटलंड ऑफ इस्ट, अशी ओळख असणाऱ्या पूर्वोत्तर भारतातील शिलाँग हासुद्धा सुट्टीसाठी एक उत्तम पर्याय. थेट विमान प्रवासाने तुम्ही शिलाँगला पोहोचू शकता. मुख्य शहरापासून येथील पर्यटनस्थळं 30 किमी अंतरावर आहेत.
दार्जिलिंग- चहाचे मळे, दिर्जिलिंगची रेल्वे आणि डोळ्यातही साठवता येणार नाही, असं दीपवणारं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जाणं हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बागडोगरा हे येथील नजीकचं विमानतळ.
शिमला - शिमला हे सर्वात लोकप्रिय आणि तितकंच किफायतशीर असं पर्यटनस्थळ. दिल्लीपासून शिमल्यापर्यंतची थेट फ्लाईट घेता येऊ शकते. तर, मुख्य विमानतळापासून इथली पर्यटनस्थळं 22 किलोमीटर अंतरावर आहेत.
सिक्कीम- गंगटोक फिरायला जाण्यासाठी तुम्ही पेक्योंग विमानतळावर थेट पोहोचू शकता. राजधानीपासून हे 28 किमी दूर आहे. निसर्गसौंदर्याचा सुरेख नजराना इथून पाहायला मिळतो.
मॅक्लोडगंज- मन तृप्त करण्याचं काम धरमशाला नजीक असणारं मॅक्लोडगंज हे ठिकाण करतं. कांगडा हे येथील सर्वात जवळचं विमानतळ आहे. अतिशय सुरेख अशा या ठिकाणी एकदा तरी भेट नक्की द्या.