5 हजार रुपयांची महागडी साडी महिलेने शोरुम बाहेरच जाळली, वाचा नेमकी घटना काय?
करवाचौथसाठी महिलेने महागडी साडी विकत घेतली, पण साडीच्या शोरुमबाहेरच जाळली
Trending News : प्रत्येक स्त्रीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे साडी (Saree). आपल्याकडे विविध प्रकारच्या, विविध रंगाच्या साड्या (Saree Collection) असाव्यात असं जवळपास प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. साडी म्हणजे स्त्रियांचा जीव की प्राणच. साडीची शॉपिंग (Saree Shopping) ही स्त्रीयांची सर्वात आवडती गोष्ट. पण यात बऱ्याचदा महिलांची फसवणूकही होऊ शकते. अनेकदा महागड्या साड्या विकत घेऊनही दुकानदारांकडून फसवणूक (Fraud) केली जाते. अशीच एक घटना समोर आली आहे.
मेरठमधल्या (Meerut) सदर बाजार इथल्या बेगम पूल रोडवरच्या एका साडी शोरुममध्ये (Saree Shop) एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. या शोरुमधून महिलेने तब्बल पाच हजार रुपयांची महागडी साडी विकत घेतली. पण ती खराब असल्याचा आरोप करत महिला साडीच्या शोरुममध्ये गेली, पण दुकानदाराने तीचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही.
मेरठमध्ये रहाणाऱ्या रीना शर्मा यांनी सदर बाजारमधल्या उत्सव रास साडी शोरुममधून करवाचौथसाठी एक साडी विकत घेतली. यासाठी त्यांनी पाच हजार रुपये खर्च केले. पण घरी गेल्यावर त्यांनी साडी नेसताच ती काही ठिकाणी फाटली. त्यामुळे ती फाटलेली साडी घेऊन रीना शर्मा पुन्हा साडीच्या शोरुममध्ये आल्या.
रीना शर्मा यांनी साडीचं कापड खराब असल्याचं दुकानदाराला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण दुकानदाराने तिला उडवून लावलं. त्यामुळे महिलेने शोरुममध्ये गोंधळ घातला. पण यानंतरही दुकानदाराने तिला दाद लागू दिली नाही. यावर संतापलेल्या महिलेने साडी शोरुमच्या समोरच असलेल्या रस्त्यावर नेऊन तिला आग लावली.
शोरुम बाहेर गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेने सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने दुकानदाराने त्या महिलेला पाच हजार रुपये परत केले.