Trending News : सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटसॅव्ही आहे. प्रत्यक्षातल्या मित्र-मैत्रिणींपेक्षा तरुणांचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. एकमेकांना कधी पाहिलं नसतानाही चॅटवर तासनतास बोलणारे देखील अनेक आहेत. इतकंच काय तर फेसबूकवरच ओळख होऊन एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणीने एका मुलाचा बीएमडब्ल्यू कारसह फोटो फेसबूकवर पाहिला आणि ती तरुणी तरुणाच्या प्रेमात पडली. फेसबूकवर दोघांचं संभाषण सुरु झालं आणि काही दिवसांचीच ओळख प्रेमात बदलली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांनी केलं लग्न
दोघांच्य भेटीगाठी वाढल्या आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न झाल्यानंतर तरुणी जेव्हा आपल्या सासरी गेली त्यावेळी तिथली परिस्थिती पाहून तिला मोठा धक्का बसला. तरुण सामान्य घरातला होता, त्याच्याकडे बीएमडब्ल्यू सोडा साधी कारही नव्हती. घरातील आर्थिक परस्थितीही बेताचीच होती. आपली फसवणूक झाली असल्याचं  लक्षात येताच तरुणीने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशमधल्या आगरामध्ये ही घटना घडली. 


काय आहे नेमकी घटना?
तरुणी ग्वालिअरमध्ये राहाणारी आहे, तर मुलगा आगरा इथे राहातो. सोशल मीडियावर या दोघांची फेसबूकवर ओळख झाली. सुरुवातीला फेसबूकवर चॅटिंग सुरु झाली यातून दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. त्यानंतर मोबाईलवर बोलणं सुरु झालं. व्हिडिओ कॉल होऊ लागले. तरुणीने फेसबूकवर त्याचा फोटो पाहिला होता. तरुण एका महागड्य बीएमडब्ल्यू कारसह या फोटोत दिसत होता. तरुणाला पाहातच तरुणी त्याच्या प्रेमात पडली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. 


भेटीत मुलाने त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार असल्याचं सांगितलं. तसंच कॅनडामध्ये जॉब करत असून महिन्याला 3 लाख रुपये पगार असल्याचंही त्या तरुणाने सांगितलं. सोशल मीडियावर त्याने लक्झरी गाड्यांबरोबरचे अनेक फोटही शेअर केले होते. तरुणीला हे सर्व खरं वाटलं. 


तरुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तरुणीने त्याच्याबरोबर लग्न केलं. दोघांच्या कुटुंबियांनीही लग्नाला परवानगी दिली. लग्नानंतर तरुणी ग्वालिअरमधून आगऱ्याला आपल्या सासरी आली. पण तरुणाने दाखवलेली सर्व स्वप्न खोटी असून आपली फसवणूक झाल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. 


सासरी आल्यानंतर मुलीने आकांड तांडव केल्यानंतर तरुण परदेशात नोकरीसाठी जात असल्याचं सांगून फरार झाला. तरुणी काही दिवस सासरी राहिली, पण काही दिवसांनी ती ग्वालिअरला आपल्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिने आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांच्या सांगण्यावरुन मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवलं असून तरुणीच्या वकिलांनी तरुणाबरोबर पुढे संसार करायचं नसल्याचं सांगितलं आहे.