बिप्लब देव यांचा पुन्हा `सेल्फ गोल`? मॉब लिचिंगच्या घटनेवर म्हणतात...
गेल्याच आठवड्यात त्रिपुरात मुलं चोरण्याच्या अफवेतून गर्दीने चार लोकांना मरेपर्यंत मारहाण केली होती.
आगरतळा: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी सुरक्षा यंत्रणांकडून सर्व राज्यांना सतकर्तेचे आदेशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचे वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून बिप्लब यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये करुन वाढ ओढवून घेतले होते. त्यामुळे मॉब लिचिंगच्या घटनेबद्दल प्रश्न विचारल्यावर ते काय बोलणार, याबद्दल साहजिकच अनेकांना उत्सुकता होती.
'टाईम्स नाऊ' वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, बिप्लब देव यांना मॉब लिचिंगविषयी विचारण्यात आले असता त्यांनी सुरुवातीला प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मात्र, त्यानंतर बोलण्याच्या ओघात त्यांनी म्हटले की, आज संपूर्ण त्रिपुरामध्ये आनंदाची लहर वाहत आहे. तुम्हीदेखील हा आनंद अनुभवा. मी स्वत:, एकदा माझा चेहरा पाहा, मी मनातून किती खूश आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी-तुम्ही असा फरक विसरुन जा, असे त्यांनी म्हटले. मात्र, गेल्याच आठवड्यात त्रिपुरात मुलं चोरण्याच्या अफवेतून गर्दीने चार लोकांना मरेपर्यंत मारहाण केली होती. मात्र, बिप्लब देव यांचे वक्तव्य पाहता त्यांना या घटनेची फारशी फिकीर नसल्याचे प्रतित होते. मुळात मॉब लिचिंगच्या घटना हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा दावा बिप्लब देव यांनी केला.