काश्मीरमध्ये तैनात होणार आणखीन १०,००० सैनिक; स्थानिक बुचकळ्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या भागांतून जवानांना एअरलिफ्ट करून काश्मीरमध्ये आणण्यात येतंय
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियान आणखीन मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं खोऱ्यात आणखीन १०,००० सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. नुकताच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. डोवाल यांनी या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत राज्यातील कायदेव्यवस्थेची समिक्षा केली. उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीर खोऱ्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या भागांतून जवानांना एअरलिफ्ट करून काश्मीरमध्ये आणण्यात येतंय. उल्लेखनीय म्हणजे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच खोऱ्यात ४० हजार अतिरिक्त सुरक्षादलांना तैनात करण्यात आलंय. त्यामुळे, आणखीन १० हजार जवानांना तैनात करण्याच्या भाजपा सरकारच्या या निर्णयानं अनेकांना बुचकळ्यात पाडलंय.
'कलम ३५ ए हटवणार?'
माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (JKPM) चे अध्यक्ष शाह फैसल यांनी खोऱ्यात काहीतरी भयंकर होणार असल्याची शंका व्यक्त केलीय.
'खोऱ्यात अचानक १० हजार सुरक्षा दलांची तैनात का करण्यात येतेय, याबाबतीत कुणालाही कोणतीही माहिती नाही. खोऱ्यात काहीतरी अघटीत होणार असल्याच्या अफवा सुरू आहेत. हे कलम ३५ ए बद्दल आहेत?' असं ट्विट त्यांनी केलंय.
मेहबूबा मुफ्ती यांचा आक्षेप
मात्र, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मात्र केंद्राच्या या निर्णयाला आक्षेप व्यक्त केलाय. 'खोऱ्यात आणखीन १० हजार सैनिक तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे लोकांमध्ये भय मनोविकृती निर्माण केलंय' असं मुफ्ती यांनी म्हटलंय.
मात्र, खोऱ्यात अतिरिक्त दलाच्या तैनातीवर जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी उत्तर काश्मीरमध्ये जवानांची संख्या कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय. खोऱ्यात अतिरिक्त जवानांसाठी आपल्याकडून विनंती करण्यात आली होती, असं त्यांनी म्हटलंय.