उत्तराखंडवर पुन्हा संकट; उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला, 50 कामगार आत अडकले
Landslide In Uttarkashi: उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात भूस्खलन झाले आहे. या बोगद्यात 50 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यातील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरु आहे.
Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा (Tunnel Collapse) काही भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 50-60 मजूर अडकल्याची माहिती आहे. या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता. तसेच इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते. त्यातच आता निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे.
उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव या बोगद्यात भूस्खलन झाले आहे. एनएचआयडीसीएलच्या माहितीनुसार, नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्यात 50 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. मात्र बोगद्यात किती कामगार अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. पाच रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतमध्ये कामगारांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या आत एक अतिरिक्त ऑक्सिजन पाईप देखील देण्यात आला आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे जाणाऱ्या 200 मीटर अंतरावर हे भूस्खलन झाले. तर बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.
ऑलवेदर रोड प्रकल्पांतर्गत तयार होत असलेल्या बोगद्याची लांबी 4.5 किमी आहे. त्यापैकी चार किमीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापूर्वी बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2023 होते, मात्र आता ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी झाला होता 53 मजुरांचा मृत्यू
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातही 2021 मध्ये बोगद्यात कामगार अडकले होते. तपोवन बोगद्यात हे कामगार अडकले होते. बोगद्यातील ढिगारा हटविण्यासाठी जेसीबीसह डंपर तैनात करण्यात आले होते. मात्र अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतरही जिल्हा प्रशासनाला यश आले नाही. शेवटी बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नवीन मशिनद्वारे ड्रिल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होते. बोगद्यात अडकल्याने 53 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.