लवकरच बाजारात येणार २० रुपयांचं नाणं
आता तुमच्या हातात येणार २० रुपयांचं नाणं
मुंबई : भारतीय चलनात आणि बाजारात आता आणखीन एक नवं नाणं येण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून २० रुपयांच्या नाण्याची निर्मिती केली जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे आता लवकरच २० रुपयांचं नाणं चलनात दिसल्यावर आश्चर्य वाटायला नको. पाहूयात कसं असेल हे २० रुपयांचं नाणं...
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २० रुपयांच्या या नाण्याची डिझाईन आणि थीम दोन्ही वेगळे असणार आहेत. हे नाणं दोन धातुंपासून बनवण्यात येणार आहे. या नाण्याच्या डिझाईनवर काम सुरु झालं असून डिसेंबर २०१८ पर्यंत हे नाणं बाजारात लॉन्च केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास २६ हजार कोटी रुपयांची नाणी चलनात आहेत. दहा रुपयांच्या नोटांची छपाई मर्यादित आहे आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. बाजारात १० आणि २० रुपयांच्या जुन्या नोटा अधिक आहेत. भारतीय चलनात सध्या जवळपास ८० हजार कोटी रुपये किमतीच्या पाच ते वीस रुपये मुल्याच्या ५७ अरब नोटा आहेत.
आरबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात सध्या ५० हजार कोटी रुपयांहून अधिक दहा आणि वीस रुपयांच्या नोटा असल्याचा आकडा फुगवून सांगितला जातो.
नोटा अधिकाधीक पाच वर्षापर्यंत चांगल्या राहतात असं मानलं जातं. तर, नाणी नेहमीच दिर्घकाळ चालतात. नोटा ठराविक काळानंतर खराब होणार म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. त्यामुळेच आता २० रुपयांचं नाणं चलनात आणण्यात येणार आहे.