VIDEO: भारतीय वायूदलाची दोन विमाने कोसळली; एका वैमानिकाचा मृत्यू
विमाने जमिनीवर कोसळल्यानंतर मोठी आग लागली.
बंगळुरू: एअरो इंडिया या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीदरम्यान मंगळवारी भारतीय वायूदलाच्या दोन विमानांचा अपघात झाला. बंगळुरूच्या येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर हवाई कसरतींचा सराव सुरु होता. यावेळी सूर्यकिरण या हवाई प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या विमानांच्या ताफ्यातील दोन विमाने अचानकपणे खाली कोसळली. विमाने जमिनीवर कोसळण्यापूर्वी वैमानिक विमानातून बाहेर पडले. मात्र, यापैकी एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अन्य दोन वैमानिक सुखरुप असल्याचे समजते. याशिवाय, दुर्घटनेत एक स्थानिक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. येलाहांका येथील न्यू टाऊन परिसरात 'इस्रो'चे केंद्र आहे. येथून जवळच्या अंतरावर ही दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. विमाने जमिनीवर कोसळल्यानंतर मोठी आग लागली व संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार हवाई कसरती करताना या विमानांची धडक झाली. त्यामुळे ही दोन्ही विमाने खाली कोसळली. बंगळुरूत उद्यापासून २० ते २४ फेब्रुवारीदरम्यान एअरो इंडिया शो ला सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.