आईच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच डॉक्टर कामावर हजर, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
खऱ्या अर्थाने डॉक्टर ठरले `देवदूत`
मुंबई : कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत आहे. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर खूप महत्वाची भूमिका साकारत आहेत. डॉक्टरांना या काळात देवदूत म्हटलं जातं आहे. ही उपमा पुन्हा एकदा खरी ठरली आहे. दोन डॉक्टरांच्या आईचे निधन झाले, अंत्यसंस्कार करून दोन्ही मुलं काही तासातच रुग्णालयात सेवेसाठी सज्ज झाले. या डॉक्टरांचं खूप कौतुक आहे.
डॉ. शिल्पा पटेल यांच्या आईचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले तर डॉ. राहुल परमार यांच्या आईचे वृ्धापकाळाने निधन झाले. असं असूनही आईवर अंत्यसंस्कार केल्यावर काही तासातच हे डॉक्टर पुन्हा एकदा रूग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या रुग्णालयात दाखल झाले.
आईच्या जाण्याने खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतानाही शिल्पा आणि राहुल करोना रुग्णांच्या सेवेसाठी हजर झाले होते. डॉक्टर शिल्पा पटेल यांनी आपल्या ७७ वर्षीय आई कांता अंबालाल पटेल यांच्या अंत्यसंस्कार केले आणि पीपीई सूट घालून पुन्हा करोना रुग्णांवरील उपचार सुरु केले.
डॉक्टर राहुल परमारची आई कांता परमार यांचं वृद्धापकाळाने गांधीनगरमधील रुग्णालयात निधन झालं. राहुल परमान कोविड मॅनेजमेंटसाठी नोडल अधिकारी म्हणून काम करत असून एका मोठ्या रुग्णालयातील मृतदेह विल्हेवाट लावणाऱ्या टीमचा भाग आहेत. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.
कोरोनाशी संपूर्ण देश लढत आहे. अशावेळी डॉक्टर ही पहिली फळी आहे जे कोरोनाशी दोन हात करत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांचं समोर आलेलं हे रुप नक्कीच कौतुकास्पद आहे. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.