श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलाकडून लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने हत्यारं जप्त केली आहेत. नावीद भट आणि आकीब यासीन भट अशी मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. सुरक्षादलाने त्यांच्याकडून एके-४७ आणि १ पिस्टल जप्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोलीस, सीआरपीएफ आणि आर्मी यांच्या संयुक्त कारवाईत या २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. अनंतनागमध्ये संगम या ठिकाणी ही चकमक झाली. यात नावीद भट, आकीब भट यांचा खात्मा करण्यात आला. एके ४७ रायफल, पिस्तुल, एके रायफलींचं मॅगझिन आणि काडतुसं जप्त करण्यात आली. 



१९ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांची ओळख जंजीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि अमीन भट अशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ते स्थानिक दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे. या चकमकीतही दहशतवाद्यांकडून एके-४७, एके-५६, पिस्टल आणि हँड-ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.


मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जम्मू - काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सेनेच्या संयुक्त दलाकडून ही कारवाई करण्यात आली होती. पुलवामातील त्रालमध्ये दहशतवाद्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून त्यांना घेराव घातला होता. त्यानंतर चकमक सुरु झाली. हे तीनही दहशतवादी 'अंसार गजवा उल हिंद' या संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.