दिल्लीमध्ये शाळकरी मुलांनीच आपल्या वर्गातील 12 वर्षाच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले. हे सर्व विद्यार्थी दिल्लीच्या सरकारी शाळेत शिकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या उन्हाळी शिबिरात हा प्रकार घडला आहे. पीडित दोन्ही मुलांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या तक्रार दाखल केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. महिला आय़ोगाने याप्रकरणी दिल्ली पोलीस आणि शिक्षण संचालकांना नोटीस पाठवली आहे. यावर उत्तर देताना, अशी कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत आणि योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्ली सरकारने दिलं आहे.


एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसंच चार आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून, बालकल्याण समितीकडे पाठवलं असल्याची माहिती दिली आहे. 


एका पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, "एप्रिल महिन्यात समर कॅम्पमध्ये 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने एका विद्यार्थ्याला जवळच्या पार्कात नेलं आणि नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. जवळपास सात दिवस हा प्रकार सुरु होता. आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला कोणाकडे वाच्यता न करण्याची धमकीही दिली होती. पीडित विद्यार्थ्याने सांगितलं आहे की, त्याने आपल्या दोन शिक्षकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. पण त्यांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं".


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या विद्यार्थ्यावरही याचं समर कॅम्पमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. "पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या शौचालयात त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. धमकावण्यात आल्याने आपण शांत बसलो होतो. 16 दिवसांपूर्वी आरोपींमधील एका विद्यार्थ्यांने पुन्हा एकदा शौचालयात त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मागील आणि आताच्या महिन्यातही आपण दोन शिक्षकांना याची माहिती दिली होती, पण त्यांनी काहीच केलं नाही असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. 5-6 दिवसांपूर्वी मुलाने आपल्या आईला सांगितलं. त्यांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असता शांत राहण्यास सांगण्यात आलं," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.


दरम्यान पीडित विद्यार्थ्यांमधील एकाच्या आईने आपण शाळेविरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की "एप्रिल महिन्यापासून सतत माझ्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तो अनेक आठवडे तणावात होता. मी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सगळा घटनाक्रम सांगितला. आरोपी मुलांकडे शस्त्र असून ते धमकावत होते. हे ऐकल्यानंतर मला धक्का बसला होता. मी अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे धाव घेतली होती. पण त्यांनी मला काही करु नका असं सांगितलं. मुख्याध्यापकांनी तर मुलं खोटं बोलत आहेत असंही म्हटलं. ते खोटं का बोलतील? दोषी शिक्षकांविरोधात कारवाई झाली पाहिजे".